भारतीय पशुचिकित्सा सेवा महासंघाची कोल्हापुरात महत्वपूर्ण बैठक; शैक्षणिक व व्यावसायिक हक्कांसाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलनाचा निर्धार


  धुळे दर्पण न्यूज :- देशातील लाखो पदविकाधारक पशुवैद्यकांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व व्यावसायिक हितासाठी स्वतंत्र राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद स्थापन व्हावी, अशी जोरदार मागणी भारतीय पशुचिकित्सा सेवा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी देशव्यापी पातळीवर लढा उभारण्याचा निर्धार महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाने नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत केला.

  कोल्हापूरमधील वृंदावन हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव जोशी होते. बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रीय सचिव डॉ. संजय दगडू पाटील यांनी केले. त्यांनी विविध राज्यांमधील प्रलंबित मागण्या, आंदोलने व सद्यस्थितीवर सविस्तर माहिती सादर केली.

- Advertisement -

  बैठकीत राष्ट्रीय समन्वयक डॉ. अजय सैनी (राजस्थान) यांनी “एक पदविका, एक जबाबदारी, एक पदनाम आणि समान वेतन” हे उद्दिष्ट स्पष्ट करत देशभरातील पदविकाधारक पशुवैद्यकांनी एकत्र येऊन सशक्त संघटना उभारावी, असे आवाहन केले. विशेष म्हणजे उत्तराखंड सरकारने दोन वर्षांच्या पदविकेऐवजी एक वर्षाची पदविका लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा महासंघाने तीव्र निषेध केला.

  कर्नाटक प्रदेश अध्यक्ष डॉ. पांडुरंग खोमणी यांनी नर्सिंग कौन्सिलच्या धर्तीवर राष्ट्रीय व्हेटरनरी कौन्सिल स्थापन करण्याचा ठराव मांडला. पुढील राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची बैठक कर्नाटकमध्येच घेण्याचे सूचित केले.

  राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यकांच्या मागण्या, मागील आंदोलने व आगामी लढ्याचे नियोजन डॉ. सागर आरुटे यांनी मांडले. राजस्थानचे महासचिव डॉ. सज्जन सिंह यांनी संघटनात्मक बांधणी भक्कम करत व्यापक देशव्यापी आंदोलन हाती घेण्याची गरज व्यक्त केली.

  कर्नाटकचे व्हेटरनरी इन्स्पेक्टर डॉ. अनिल कुमार यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय अभ्यासक्रम व दर्जावाढीबाबत सखोल माहिती प्रभावी पीपीटी सादरीकरणातून मांडली, ज्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भरभरून कौतुक केले.

  यावेळी डॉ. हरि नारायण बैरवा, डॉ. राकेश पुरी, डॉ. रमेश मोरे यांनीही आपली मते मांडून राष्ट्रीय पातळीवरील लढ्यास पाठिंबा दर्शविला.

- Advertisement -

  अध्यक्षीय समारोपात डॉ. नारायणराव जोशी यांनी सांगितले की, “पदविकाधारक पशुवैद्यकांना शैक्षणिक व व्यावसायिक अधिकार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मजबूत संघटना उभी करणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्यात संघटना भक्कम करत राष्ट्रीय परिषद स्थापनेसाठी एकजुटीने संघर्ष करावा लागेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या बैठकीमुळे पशुवैद्यक समाजात नवचैतन्य संचारले असून लवकरच देशभरातील पदविकाधारक पशुवैद्यकांचा एकत्रित आवाज दिल्लीच्या दालनात पोहोचवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण – 
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
- Advertisement -