धुळे दर्पण न्यूज :- संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर जाहीर होणार आहे. तब्बल १७ वर्षांनंतर एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्थेच्या) विशेष न्यायालयात हा ऐतिहासिक निर्णय होणार असून, या प्रकरणात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींचा समावेश आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

२००८ मध्ये झाला होता भीषण स्फोट

  २९ सप्टेंबर २००८ रोजी सायंकाळच्या सुमारास मालेगाव (नाशिक जिल्हा) येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मोठी हाहाकार उडाली होती. या स्फोटात ६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे १०१ जण जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.

सुरुवातीचा तपास आणि एनआयएकडे वर्ग

  या प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला. तपासात हिंदू उजव्या विचारसरणीच्या काही गटांशी संबंधित आरोपींवर संशय व्यक्त करण्यात आला. पुढे २०११ मध्ये हा खटला राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. एनआयएने २०१६ मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

तपास प्रक्रियेत आलेले बदल

  या दीर्घकाळ चाललेल्या खटल्याच्या प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल ३ तपास संस्था बदलल्या, तसेच ४ न्यायाधीश बदलले गेले. यापूर्वी ८ मे २०२५ रोजी निकाल लागणार होता, मात्र तो पुढे ढकलत ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

प्रकरणातील मुख्य आरोपी

  या खटल्यातील आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिकर, समीर कुलकर्णी, स्वामी दयानंद पांडे आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर हिंदुत्व विचारसरणीशी जोडलेल्या मोठ्या कटाचा भाग म्हणून स्फोटाची योजना आखल्याचा आणि प्रत्यक्ष स्फोट घडवून आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

साक्षीदारांनी बदलले जबाब

  या खटल्यातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, एकूण ३२३ साक्षीदारांपैकी तब्बल ३२ साक्षीदारांनी न्यायालयात आपले जबाब बदलले. राष्ट्रीय तपास संस्थेने न्यायालयाकडे आरोपींविरुद्ध कोणतीही सौम्यता दाखवू नये, अशी विनंती केली होती.

राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोप

  या प्रकरणावरून मोठा राजकीय संघर्षही पेटला. भाजप नेते राम कदम यांनी आरोप केला की, "त्या काळात सत्तेत असलेल्या काँग्रेसने हिंदू समाज, साधू-संत आणि आमच्या संस्थांना बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र रचले. भगवा आमच्यासाठी पूजनीय असून, त्याला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. साध्वी प्रज्ञा यांच्यावर जबरदस्तीने आरोप लादण्यात आले, असे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही मान्य केले."

- Advertisement -

संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे

  १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायप्रक्रियेनंतर आज अखेर या प्रकरणाचा निकाल येणार असल्याने देशभरातून प्रचंड उत्सुकता व्यक्त होत आहे. न्यायालयाचा निर्णय केवळ आरोपींसाठीच नव्हे, तर या प्रकरणाशी जोडलेल्या अनेक राजकीय आणि सामाजिक चर्चांसाठीही निर्णायक ठरणार आहे.



धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -