महाराष्ट्र निरीक्षण

धुळे : धुळे महानगरपालिका शाळा क्रमांक २० सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. शाळेच्या परिसरात पावसाचे घाण पाणी साचले असून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. वारंवार मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या तरीही आजवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

शाळेला मुख्य प्रवेशद्वारच नसल्याने केवळ विद्यार्थीच नव्हे तर शाळेतील साहित्य आणि बांधकामावरही चोरी व नुकसानीचा धोका वाढला आहे. अलीकडेच शाळेजवळ नवीन काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला. मात्र, या रस्त्याची उंची इतकी ठेवण्यात आली की सर्व पावसाचे पाणी थेट शाळेच्या परिसरात वळवले गेले आहे. परिणामी शाळेच्या अंगणात डबक्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

एका बाजूला स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ पंधरवडा अभियान राबवले जात असताना दुसऱ्या बाजूला मनपा शाळांची अशी दुर्दशा हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण असल्याचे पालक व स्थानिक नागरिकांनी सांगितले.

स्थानिक रहिवासी व पालकांनी मनपा प्रशासनाने तातडीने पावसाचे पाणी काढून शाळेला प्रवेशद्वार उपलब्ध करून द्यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -