📰 महाराष्ट्र निरीक्षण

नंदूरबार (दि. २४ सप्टेंबर)
आदिवासी युवक जय वळवीच्या हत्येच्या निषेधार्थ आज नंदूरबार येथे काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला अनपेक्षितपणे हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात उभ्या असलेल्या वाहनांवर काही उपद्रवींनी दगडफेक करून तोडफोड केली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. अखेरीस पोलिसांना लाठीचार्ज व अश्रूधुराचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
- Advertisement -

या घटनेत एका पोलिस अधिकाऱ्यासह एक पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आणखी काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी नेमका आकडा स्पष्ट नाही.

काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या हाणामारीत जय वळवी याचा मृत्यू झाला होता. पोलिस तपासानुसार, आरोपी सूर्यकांत मराठे याने चाकूहल्ला करून जयचा खून केला होता. या प्रकरणी आदिवासी समाजात संतापाची लाट असून आजचा मोर्चा त्याच निषेधार्थ काढण्यात आला होता.

मोर्चा शांततेत पार पडत असतानाच काही उपद्रवींनी अचानक तोडफोड सुरू केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी कठोर कारवाई करून जमावाला पांगवले.

- Advertisement -

आदिवासी बांधवांनी जय वळवी हत्याकांडाचा खटला त्वरीत न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, तसेच पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.