नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राहूड घाट येथे दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोलियमच्या गॅस टँकरचा अपघात झाला. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. अपघातानंतर तातडीने पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.  


परिस्थिती लक्षात घेऊन चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा महामार्ग (NH-3) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे नाशिक-धुळे दरम्यान जाणाऱ्या वाहनांना पोलिस प्रशासनाने तात्पुरते मार्ग बदलून दिले आहेत.  


 पर्यायी मार्ग जाहीर  


- नाशिककडून धुळे बाजूस जाणारी वाहतूक:  

  नाशिक – चांदवड चौफुली – मनमाड – मालेगाव – धुळे  


- धुळेहून नाशिककडे येणारी वाहतूक:  

  १) धुळे – मालेगाव – मनमाड – चांदवड चौफुली – नाशिक  

  २) धुळे – मालेगाव – देवळा – सोग्रस फाटा – नाशिक  


प्रशासनाचे आवाहन  


गॅस गळतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तांत्रिक पथक प्रयत्नशील आहे. सकाळपासून काम सुरू असून दुपारी सुमारे ४ वाजेपर्यंत सर्व काम पूर्ण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  


नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.