हजेरीपत्रकावर सहीसाठी आठ हजारांची मागणी – लाच घेताना मुकादम रंगेहात अडकला

  महाराष्ट्र निरीक्षण: धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रामाणिक सफाई कामगाराकडून हजेरीपत्रकावर सहीसाठी थेट आठ हजार रुपयांची लाच मागितली गेली. ही मागणी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, खुद्द मुकादम होता! मात्र, या कर्मचाऱ्याने तडजोड करत सात हजार रुपये देण्याचे मान्य केले आणि त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचत आरोपी मुकादमास रंगेहात पकडले.

Follow the महाराष्ट्र निरीक्षण channel on WhatsApp:


नेमके काय घडले?

  महापालिकेच्या मोहाडी उपनगरातील सफाई कर्मचाऱ्याने ऑगस्ट २०२५ पर्यंत आपले काम इमाने इतबारे पार पाडले. त्यानंतर पुढील महिन्याच्या पगारासाठी आवश्यक असलेले हजेरीपत्रक मुकादम रवींद्र धुमाळ (वय ५०, रा. भटाईमाता रिक्षा स्टॉपजवळ, मोहाडी उपनगर) याच्याकडे दिले.

- Advertisement -

  पण धुमाळ याने कायद्याने मिळणाऱ्या हक्काच्या पगारासाठी हजेरीपत्रकावर सही करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागितली. प्रामाणिक कामगाराने लाच न देता ACB कडे धाव घेतली. तडजोडीनंतर रक्कम सात हजारांवर आली, आणि त्यानंतर ACB च्या पथकाने कारवाईचा प्लॅन आखला.


ACB चा यशस्वी सापळा

  ACB च्या पथकाने धुळे शहरात सापळा रचून मुकादम रवींद्र धुमाळ याला सफाई कामगाराकडून सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. यानंतर त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

  ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रशांत बागूल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांचा समावेश होता.


"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

ACB कडून आवाहन

  कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असेल, तर तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा गुन्ह्यांची माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाते.


📞 संपर्कासाठी ACB हेल्पलाइन:

  1064 किंवा acbmaharashtra.gov.in


🗞️ महाराष्ट्र निरीक्षण – जनतेच्या हक्कासाठी सजग

प्रामाणिक कामगारांचं मनोबल उंचावण्यासाठी आणि लाचखोरांना चाप लावण्यासाठी अशा धाडसी कारवायांची नितांत गरज आहे! 

- Advertisement -