धुळे दर्पण न्यूज:- शहरातील विकास कामांसाठी गेल्या पाच वर्षांत शेकडो कोटींचा निधी आणणारे आमदार फारुक शाह यांच्या पाठपुराव्याला पुन्हा यश आले आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी त्यांनी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. या निधीतून श्रीराम पेट्रोल पंप ते गुरुद्वारा, देवपूर दत्तमंदिर ते गोंदूर रोड, आग्रारोड बायपास ते आरटीओ कार्यालयासह इतर रस्त्यांचा कायापालट केला जाणार आहे. दरम्यान, निधी मंजूर केल्याबद्दल आ. शाह यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
आमदार फारुक शाह यांनी गेल्या पाच वर्षांपासून विकासकामांचा झंझावात सुरु ठेवला आहे. प्रत्येक प्रभागातील रस्ते, गटारींसह विविध विकासकामांसाठी त्यांनी आतापर्यंत कोट्यवधींचा निधी शासनाकडून खेचून आणला आहे. राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, इतर मागासवर्ग, वित्त व नियोजन विभागामार्फत त्यांनी हा निधी आणला असून अनेक विकासकामांना चालना दिला आहे. आता निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही आ. शाह यांनी विकासकामांसाठी शासनाकडे
पाठपुरावा सुरुच ठेवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते व पूल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२४-२५ अंतर्गत धुळे शहर मतदार संघातील रस्ते दुरुस्तीसाठी २२ कोटी निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्य अभियंता नासिक यांचे नावाने मंजुरी आदेशही निर्गमित केले आहेत.
या रस्त्यांचा होणार कायापालट !
या निधीतून आग्रारोड श्रीराम पेट्रोल पंप ते गुरुद्वारा रस्ता डांबरीकरण करणे (८ कोटी), आग्रारोड बायपास ते आरटीओ कार्यालाय ते कुंडाने जापी रस्ता विशेष दुरुस्ती करणे (७.५० कोटी), तिखी-मोघण रस्ता मोहाडीपासून विशेष दुरुस्ती करणे (३.५० कोटी), देवपूर दत्त मंदिर ते गोंदुर रस्ता विशेष दुरुस्ती करणे या कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांची निविदा प्रकाशित होवून आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांना सुरुवात होईल. शहरासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आ. फारुख शाह यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहे. दरम्यान, आ. शाह यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यातही विकासकामांचा धडाका सुरुच ठेवल्याने शहरातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

