धुळे दर्पण न्यूज :- दि. २८: धुळे महानगरपालिकेने थकबाकीदार संस्थांविरुद्ध कठोर भूमिका घेत थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मोहिमेला गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने जवाहर मेडिकल कॉलेजवर कारवाई करत अधिष्ठातांचे कार्यालय सील केले. महापालिकेच्या या कठोर कारवाईमुळे धुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सात कोटींच्या थकबाकीवर कठोर पाऊल
महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांना वेळोवेळी कर भरण्यासाठी नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, काही संस्था आणि प्रतिष्ठानांनी या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या आदेशानुसार, मार्च अखेर १०० कोटीहून अधिक थकबाकी वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे शहरातील तीन प्रमुख संस्थांकडे तब्बल सात कोटींची थकबाकी असल्याचे महापालिकेच्या नोंदींमध्ये आढळून आले आहे. या थकबाकीदारांमध्ये जवाहर मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज आणि जवाहर शेतकरी सुतगिरणी यांचा समावेश आहे. नोटीसीनंतरही भरणा न केल्याने महापालिकेच्या पथकाने जवाहर मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांचे कार्यालय सील करण्याचा निर्णय घेतला.
कारवाईवेळी मनपा अधिकाऱ्यांची उपस्थिती
या कारवाईवेळी अतिरिक्त आयुक्त करूणा डहाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहायक आयुक्त स्वालिया मालगावे, तसेच जप्ती आणि वसुली पथकाचे अधीक्षक मधुकर निकुंभ, निरीक्षक मनोज चिलंदे आणि मनीष ठाकरे उपस्थित होते. महापालिकेच्या या निर्णायक कृतीनंतर आता जवाहर मेडिकल कॉलेज किती दिवसांत थकबाकी भरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवाहर मेडिकल कॉलेज प्रशासनाचा आरोप – न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
महापालिकेच्या या कारवाईनंतर जवाहर मेडिकल कॉलेज प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून, प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही मनमानी कारवाई केली असा आरोप केला आहे.
![]() |
| - Advertisement - |
“जवाहर मेडिकल फाउंडेशन ही धर्मदाय संस्था असून, महापालिकेने आम्हावर अवाजवी मालमत्ता कर लादला आहे. या अन्यायकारक करवाढीविरोधात आम्ही औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणतीही कारवाई होऊ नये, अशी विनंती असतानाही महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालय सील केले. ही कारवाई नियमबाह्य आणि अन्यायकारक असून, आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.”
महापालिकेच्या कारवाईमुळे धुळे तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका मोठ्या शैक्षणिक संस्थेवर इतकी मोठी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
महापालिकेची भूमिका आणि पुढील पावले
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, वारंवार नोटीसा देऊनही कर भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. “प्रत्येक नागरिक आणि संस्थेने कर भरणे ही जबाबदारी आहे. न्यायालयीन प्रकरण असले तरी कर भरण्याची जबाबदारी संस्थेचीच आहे,” असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुढील काही दिवसांत जवाहर मेडिकल कॉलेज थकबाकी भरते की न्यायालयात जातो, यावर संपूर्ण प्रकरणाचे भवितव्य ठरणार आहे. महापालिकेच्या या कारवाईनंतर इतर थकबाकीदार संस्थाही सतर्क झाल्या आहेत.
सैय्यद सानिल, धुळे दर्पण
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



