धुळे दर्पण न्यूज :- प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी धुळे जिल्ह्यातील दोन ठिकाणी आत्मदहनाचे प्रकार उघडकीस आले. पहिला प्रकार जिल्हा परिषदेच्या आवारात घडला, तर दुसरा प्रकार पोलीस कवायत मैदानावर समोर आला. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
जिल्हा परिषदेतील आत्मदहनाचा प्रकार
साक्री तालुक्यातील जैताणे ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान महाले यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. समाधान महाले यांचा आरोप आहे की, जैताणे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक मनमानी कारभार करत आहेत. दलित वस्तीतील विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी अन्य ठिकाणी वळवला जात असून, दलित वस्तीतील लोकांना न्याय मिळत नाही.
महाले यांनी सांगितले की, २०२२-२३ साली दलित वस्तीतील हायमास्ट लावण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याचे बिल देखील काढण्यात आले, पण आजपर्यंत दलित वस्तीत हायमास्ट बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निधी भ्रष्टाचारामध्ये खर्च झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
![]() |
| - Advertisement - |
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पोलीस कवायत मैदानातील घटना
धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण सुरु असताना शिरपूर तालुक्यातील वावडे आनंदा पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
वावडे पाटील यांचा आरोप आहे की, शिरपूर येथील काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस निरीक्षक दीपक पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने हस्तक्षेप करून वावडे पाटील यांना ताब्यात घेतले.
सध्याची परिस्थिती आणि चौकशी
सध्या समाधान महाले आणि वावडे आनंदा पाटील या दोघांनाही पोलीस ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे. या घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेतली असून दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी केली जात आहे.
न्यायासाठी झगडणाऱ्या नागरिकांचे प्रश्न
जैताणे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दलित वस्तीतील विकासकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तातडीने पाठपुरावा करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. तसेच, पोलीस विभागातील अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या वावडे पाटील यांच्या प्रकरणातही सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- सैय्यद सानिल
(धुळे दर्पण)
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

