धुळे दर्पण न्यूज :-  धुळे शहरात गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराचा महापूर आल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेच्या तिजोरीची खुलेआम लूट होत असून, प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधारी भाजप यांचे घनिष्ठ साटेलोटे हेच याचे प्रमुख कारण असल्याचे आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी केले आहेत. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दीपमाळ घोटाळ्याचा भांडाफोड करत, प्रशासन आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

महानगरपालिकेतील ‘अंधेर नगरी, चौपट राजा’ प्रकार

  अनिल गोटे यांनी सांगितले की, दीपमाळ प्रकरण हे धुळेकरांसाठी भ्रष्टाचाराचा एक उघड नमुना आहे. या प्रकल्पासाठी कुणीही मागणी केली नव्हती, कुठलीही तरतूद नव्हती, तरीही महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी हे काम मंजूर करून घेतले. विशेष म्हणजे, शहरात कोणतेही सौंदर्यीकरण किंवा नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी सहसंचालक नगर विकास विभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र, येथे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता काम मंजूर करण्यात आले.


  शहर अभियंता, मुख्य अभियंता, अंदाजपत्रक तयार करणारा अधिकारी, तसेच तांत्रिक मंजुरी देणारा अधिकारी – ही सर्व पदे एकाच व्यक्तीकडे असल्याचे समोर आले आहे. "हे म्हणजे शिपाईही तोच आणि साहेबही तोच" अशी अवस्था निर्माण झाली असून, हा प्रकार सरळसरळ भ्रष्टाचाराचा आहे, असे गोटे यांनी म्हटले आहे.


३० लाखांचे काम १ कोटी ३० लाखांत!

  या दीपमाळ प्रकल्पासाठी महानगरपालिकेने तब्बल १ कोटी ३० लाख रुपये खर्च मंजूर केला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाचा अंदाजित खर्च ३० ते ३३ लाख रुपये असायला हवा, असे स्पष्ट केले आहे. म्हणजेच, ३०० टक्क्यांनी अधिकचा निधी मंजूर करून भ्रष्टाचाराची मोठी खेळी खेळली जात आहे.


  गोटे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनीही एवढ्या प्रचंड खर्चावर आश्चर्य व्यक्त केले. हे पैसे कुठे आणि कसे जात आहेत? या प्रश्नाचे उत्तर महानगरपालिका आणि प्रशासन देणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

७० लाखांचे दिवे म्हणजे सुवर्ण प्रकाश?

  दीपमाळ प्रकल्पाअंतर्गत ७० लाख रुपयांचे दिवे बसवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या किंमतीचे दिवे नक्की कोणते आहेत? एवढ्या खर्चाची आवश्यकता का आहे? याचा खुलासा अद्याप कोणीच केलेला नाही. शिवाय, या निधीचा खर्च ‘मूलभूत सुविधा’ लेखाशीर्षाखाली केला जात आहे. दीपमाळ उभारल्याने नागरिकांना कोणत्या मूलभूत सुविधा मिळणार आहेत, हे आयुक्तांनी जाहीरपणे सांगावे, अशी मागणी गोटे यांनी केली आहे.


भाजपच्या हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार!

  या संपूर्ण प्रकारात प्रशासनाचे आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचे संगनमत असल्याचा आरोप करताना गोटे यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही प्रहार केला. "भाजपचे हिंदुत्व म्हणजेच भ्रष्टाचाराची कवचकुंडले. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणारे आता हिंदुत्वाचे ठेकेदार बनले आहेत." असे ते म्हणाले.


  या दीपमाळ प्रकरणात पोलिस प्रशासनालाही सहभागी करून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकल्पाला कुठलीही हरकत नसल्याचे पत्र दिले आहे. मात्र, अशा नागरी प्रकल्पांसाठी पोलीस विभागाचा काहीच संबंध नसताना, हे पत्र का दिले गेले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचाराला पोलीसही पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -
“भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा जळगाव घरकुल घोटाळ्याचा दुसरा भाग धुळ्यात होईल”

  शेवटी, गोटे यांनी आयुक्त आणि महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना चेतावणी देत म्हटले की, "दीपमाळ प्रकरण गांभीर्याने घ्या. जनतेच्या पैशांची लूट खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा, जळगाव घरकुल घोटाळ्याचा दुसरा भाग धुळे महानगरपालिकेत घडेल आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील."


धुळेकरांच्या मनात संतापाची लाट

  या प्रकरणामुळे धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे. महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात नागरिक आक्रमक होत आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रारीही दाखल केल्या आहेत. लवकरच यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची शक्यता आहे.


  धुळेकरांना आता या भ्रष्ट कारभाराविरोधात एकजूट होऊन आवाज उठवावा लागणार आहे. अन्यथा, भविष्यात अशाच प्रकारच्या प्रकल्पांद्वारे महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडे घालण्याचा हा प्रकार सुरूच राहील.

---

(संपादक – सैय्यद सानिल, धुळे दर्पण)

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -