धुळे दर्पण न्यूज :- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने पक्षाला विजय मिळवून दिला. मात्र, आता पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या सशक्तीकरणासाठी स्थानिक स्तरावरील निवडणुकांना अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे मत भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
भाजपाच्या सदस्य नोंदणीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, "नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. मात्र, आता या निवडणुका संपल्या असून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांना महत्त्व आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या पाहिजेत."
सक्रिय सदस्यसंख्येत वाढ करण्याचे निर्देश
या बैठकीत पक्षाच्या विविध मोर्चे, आघाड्या आणि कार्यकारिणी सदस्यांचे कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रिय सदस्य नोंदणी मोहिमेस वेग द्यावा, असे निर्देश देण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आ. अग्रवाल म्हणाले, "सक्रिय सदस्यत्व नोंदणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने किमान १०० नवीन सदस्य नोंदणी करणे आवश्यक आहे. सध्या भाजपाच्या सक्रिय सदस्यांची संख्या केवळ १२० आहे, म्हणजेच प्रत्येक सदस्याने १०० नवीन लोकांना पक्षाशी जोडले आहे. मात्र, हे प्रमाण वाढवून १२०० सक्रिय सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक बूथवर किमान ३० सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे, त्यामुळे ज्यांनी अजून सदस्य नोंदणीला सुरुवात केली नाही, त्यांनी वेगाने काम करावे."
![]() |
| - Advertisement - |
"ज्यांना पक्षाची गरज नाही, त्यांची पक्षाला गरज नाही"
यावेळी आ. अग्रवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "जे कार्यकर्ते पक्षसंघटनेतील पदावर आहेत, पण अजूनही त्यांनी स्वतःचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही, त्यांनी तातडीने सदस्य व्हावे. अन्यथा, त्यांच्या जागा रिक्त करण्याचा विचार पक्ष करेल. पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पुढे संधी मिळेल. ज्यांना पक्षाची गरज नाही, त्यांची पक्षाला गरज नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षसंघटनेत सक्रीय सहभाग घ्यावा आणि आपली भूमिका ठळक करावी."
प्रदेश नेतृत्वाचे स्पष्ट निर्देश
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्ष संघटनेसाठी ठोस निर्देश दिले आहेत. "पक्षात पद हवे असेल, तर सक्रिय सदस्यत्व गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुक कार्यकर्त्याने किमान १०० नवीन सदस्यांची नोंदणी करावी," असेही आ. अग्रवाल यांनी सांगितले.
बैठकीला अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती
या आढावा बैठकीला भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यामध्ये माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी महापौर तसेच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, महादेव परदेशी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, मायादेवी परदेशी यांच्यासह पक्षाच्या विविध मोर्चा आणि आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
भाजपासाठी येणारे दिवस महत्त्वाचे
भाजपाच्या स्थानिक आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आता जोमाने तयारीला लागावे आणि पक्षसंघटनेत अधिकाधिक नवीन सदस्य जोडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. अनुप अग्रवाल यांनी केले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


