धुळे दर्पण न्यूज :- राज्यातील परमिट रूम आणि बिअर बारमध्ये विक्री होणाऱ्या दारूवरील करवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी धुळे जिल्हा हॉटेल बिअर-बार असोसिएशनने केली आहे. याबाबत असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. वारंवार वाढणाऱ्या करामुळे व्यवसाय अडचणीत आल्याने राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून ही वाढ मागे घ्यावी, अशी व्यवसायिकांची मागणी आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

व्यवसाय टिकवणे कठीण

  महाराष्ट्र शासनाने परमिट रूममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील व्हॅट करात १० टक्के वाढ केली आहे. तसेच २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी परमिट रूम आणि बिअर बार अनुज्ञप्तीच्या नूतनीकरण शुल्कात तब्बल १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे परवानाधारक व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे. आधीच मंदीमुळे मद्यविक्री घटली असताना अतिरिक्त कर आणि शुल्कवाढीमुळे व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे.


  असोसिएशनने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, मागील काही वर्षांपासून व्यवसायिक आर्थिक अडचणीत आहेत. कोरोना महामारी, वाढती महागाई आणि मंदीमुळे ग्राहकसंख्या घटली आहे. अशा परिस्थितीत शासन वारंवार करवाढ करत असल्याने व्यवसाय आणखीनच अडचणीत आला आहे.


ग्राहकांवरही परिणाम

  करवाढीमुळे मद्यविक्रीच्या किमती वाढल्या असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होत आहे. वाढीव किमतीमुळे ग्राहक संख्या घटली असून त्यामुळे व्यवसायिकांचे उत्पन्नही कमी झाले आहे. परिणामी, हॉटेल, परमिट रूम आणि बिअर बार चालवणाऱ्या व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

  धुळे जिल्हा हॉटेल बिअर-बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ही करवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. या वेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष हेमंतकुमार सुर्यवंशी, सचिव देवेंद्र पाटील, राजेश चौधरी, रविंद्र चौधरी, भूषण एलमामे, निरज वाघ, प्रदीपशेठ कटारीया, मयुर खोपडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

सरकारने त्वरित निर्णय घ्यावा

  व्यवसाय अडचणीत आलेला असताना करवाढ केल्यास अनेक व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने हॉटेल आणि मद्यविक्री व्यवसायाला चालना देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि वाढीव १० टक्के व्हॅट कर आणि १५ टक्के नूतनीकरण शुल्क त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. शासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर भविष्यात आंदोलनाचा इशाराही असोसिएशनने दिला आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -