धुळे दर्पण न्यूज :- केंद्र सरकारकडून "हर घर नल, हर घर जल" ही घोषणा दिली जात असली तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्र समस्या आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील ब्रम्हिन भागात भीषण पाणीटंचाई असून, जलजीवन मिशनच्या दाव्यांची पोलखोल करत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत धुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या समस्यांवर आवाज उठवला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
तापी नदीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २२५ कोटी रुपये, अक्कलपाडा धरणाच्या जमीन अधिग्रहणासाठी ५०० कोटी रुपये, प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी ७९३ कोटी रुपये, आणि हरणबारी व केळझर धरणासाठीही अतिरिक्त निधी देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.
तापी पाणीपुरवठा योजनेसाठी २२५ कोटींची मागणी
धुळे शहराचा पाणीपुरवठा तापी नदीवर आधारित आहे, परंतु तापी पाणीपुरवठा योजना चार दशकांपूर्वी तयार करण्यात आली असून, तिच्या पाईपलाइनमध्ये वारंवार गळती होत आहे. परिणामी, धुळे शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. नव्याने ३५ ते ४० किलोमीटर लांबीची पाईपलाइन टाकण्यासाठी २२५ कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी बच्छाव यांनी केली आहे.
![]() |
| - Advertisement - |
धुळे तालुक्यातील अक्कलपाडा धरण केवळ ६५% क्षमतेने भरले जाते, उर्वरित ३५% पाणी वाहून जाते. धरण १००% क्षमतेने भरण्यासाठी २०० हेक्टर जमीन अधिग्रहण करणे आवश्यक आहे, यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी खासदार बच्छाव यांची मागणी आहे. यामुळे धुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळेल, तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी ७९३ कोटी रुपये
शिंदखेडा आणि नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेमुळे २८ गावे सिंचनाखाली येतील आणि ७ हजार ८५ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाला ७९३ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असूनही काम अद्याप अपूर्ण आहे. तातडीने निधी मंजूर करून योजना कार्यान्वित करण्याची मागणी खासदार बच्छाव यांनी लोकसभेत केली.
हरणबारी आणि केळझर धरणासाठी निधी देण्याची मागणी
सटाणा (बागलाण) तालुक्यातील हरणबारी आणि केळझर (गोपाळसागर) धरणांच्या कालव्यांच्या कामांसाठी निधी मंजूर करावा, अशीही त्यांनी मागणी केली. हरणबारी धरणाच्या डावा आणि उजवा कालव्याचे अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्यासाठी ३७ कोटी रुपये आवश्यक आहेत. तसेच, केळझर धरणाचा कालवा अजमेर सौंदाणेपर्यंत वाढवण्याचे काम लवकर सुरू करावे, अशी विनंती त्यांनी केली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
जनतेतून अभिनंदनाचा वर्षाव
खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने संसदेत धुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाणीपुरवठा आणि सिंचन प्रकल्पांसाठी आवाज उठवला. त्यांच्या या प्रयत्नामुळे मतदारसंघातील नागरिकांतून त्यांचे कौतुक होत आहे. जलजीवन मिशनच्या कारभारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून, त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
![]() |
| - Advertisement - |
"पाणी ही मुलभूत गरज, सरकारने तातडीने निधी मंजूर करावा"
"पाणी ही जनतेची प्राथमिक गरज आहे. मतदारसंघातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळावं, यासाठी मी संसदेत मागणी केली आहे. सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा," असे खासदार बच्छाव यांनी स्पष्ट केले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



