धुळे दर्पण न्यूज – "आरोग्यसेवा हाच खरा धर्म" या तत्त्वानुसार AB फाउंडेशन आणि प्रतीक दादा कर्पे मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी, धुळे शहरातील मनमाड जीन पाण्याच्या टाकीजवळ, 80 फूट रोड येथे महाआरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात एकूण 1560 प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या, उपचार व गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या शिबिराचे उद्घाटन ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी आ. अनुप अग्रवाल असतील. यावेळी डॉ. सुभाष भामरे, विजय चौधरी, आ. राम भदाणे, गजेंद्र अंपळकर, अमरिशभाई पटेल, चंद्रकांत रघुवंशी, मंजुळा गावित, राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आयुक्त अमिता दगडे पाटील, आ. राजेश पाडवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरासाठी आतापर्यंत 2000 हून अधिक रुग्णांनी नाव नोंदणी केली असून, नागरिकांनीही या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदवावी, असे आवाहन माजी महापौर प्रदीप कर्पे यांनी पत्रकार परिषदेत केले. यासाठी घरोघरी जाऊन नाव नोंदणी मोहीम राबवली जात आहे.
शिबिरात हृदयरोग, मेंदू विकार, किडनी, ऑर्थोपेडिक, महिलाविषयक आजार, त्वचा विकार, कर्करोग, मधुमेह, थायरॉईड, ENT, दंत, बालरोग आदी तपासण्या आणि उपचार करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया देखील मोफत केली जाणार आहे.
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध खाजगी रुग्णालयांतील 50 ते 60 डॉक्टर या शिबिरात सेवेसाठी उपस्थित राहतील. विशेष म्हणजे, 38 हजार प्रकारच्या रक्त तपासण्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने, तसेच आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया केल्या जातील.
याशिवाय शिबिरात मोफत चष्मावाटप, रक्तदान शिबिर, आणि काही रुग्णांसाठी MRI तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. ज्या रुग्णांना उच्चस्तरीय उपचारांची आवश्यकता भासेल, त्यांना मुंबई व पुणे येथील रुग्णालयात मोफत उपचार व राहण्याची व्यवस्था करण्यात येईल.
AB फाउंडेशनचे कमलेश देवरे यांनी सांगितले की, फाउंडेशनची स्थापना चार महिन्यांपूर्वी झाली असून, आतापर्यंत सहा आरोग्य शिबीरे आयोजित करून हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. मुंबईतील के. एम. रुग्णालयात सहा रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्या नातेवाईकांसाठी देखील मोफत निवास व भोजनाची सोय केली आहे.
धुळे जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील गरजू नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रतीक सदा कर्ण निमगडे परिवार आणि AB फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
