धुळे दर्पण न्यूज :-  महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या महत्वाकांक्षी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल ८ लाख लाभार्थी महिलांच्या दरमहा मिळणाऱ्या हप्त्यात कपात करण्यात आली असून, आता त्यांना १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार आहेत. ही कपात त्या महिलांवर लागू होणार आहे, ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी (NSMN) योजनेचा लाभ आधीच घेत आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांची छाननी सुरू

  राज्य सरकारकडून सध्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची तपासणी (स्क्रूटनी) सुरू आहे. याच प्रक्रियेत हे उघड झाले की सुमारे ८ लाख महिला अशा आहेत, ज्या NSMN योजनेअंतर्गत आधीच दरमहा १००० रुपये मिळवत आहेत. त्यामुळे या महिलांना एकूण मिळणाऱ्या आर्थिक लाभात समतोल ठेवण्यासाठी ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत केवळ ५०० रुपये देण्यात येणार आहेत.

- Advertisement -
लाभार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता

  ऑक्टोबर २०२४ मध्ये या योजनेसाठी २.६३ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, स्क्रूटनीनंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये ही संख्या २.५२ कोटींवर आली. सरकारचे असे म्हणणे आहे की ही संख्या पुढील काही महिन्यांत आणखी १० ते १५ लाखांनी कमी होऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात यापूर्वीच सूचक विधान केले होते.


योजनेचे पात्रता निकष

  राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची निवड काही निश्चित निकषांच्या आधारावर केली जात आहे:

  1. लाभार्थ्यांचे वय १८ ते ६५ वर्षांदरम्यान असावे.
  2. लाभार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये पेक्षा कमी असावे.
  4. घरात कार असल्यास किंवा कुणी सदस्य सरकारी नोकरीत असल्यास लाभ मिळणार नाही.
  5. अन्य कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना ‘लाडकी बहिण’ योजनेचा पूर्ण हप्ता (१५०० रुपये) मिळणार नाही – एकूण लाभाची मर्यादा १५०० रुपये ठेवण्यात आली आहे.


महिलांमध्ये नाराजीचा सूर

  हप्त्यात झालेल्या या कपातीमुळे अनेक महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. काही महिला संघटनांनी सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, एकाच घरात वेगवेगळ्या योजनेचे लाभ घेणाऱ्या व्यक्ती असू शकतात, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, सरकारने या निर्णयाला वित्तीय शिस्तीचा भाग असल्याचे सांगत, दुहेरी लाभ टाळणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

सरकारची भूमिका स्पष्ट

  राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, योजना अधिक पारदर्शक आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचावी, यासाठी ही छाननी आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या तपासणीनंतर येत्या काही महिन्यांत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.


मुख्य संपादक:- सैय्यद सानिल

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -