धुळे दर्पण न्यूज :- अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ब्राह्मण, भटजी, मौलवी व विविध धर्मगुरूंनी 'बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा' घेऊन समाजात जनजागृती घडवून आणण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीना भोसले यांनी केले. या उपक्रमाची माहिती सोमवारी (दि. 28 एप्रिल) साक्री रोडवरील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रकल्प समन्वयक प्रेम वाकळे, टीम मेंबर अलका थोरात व सत्यम भोसले उपस्थित होते.


  पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमती भोसले म्हणाल्या की, 'अ‍ॅक्सेस टू जस्टीस' कार्यक्रमांतर्गत 'बालविवाहमुक्त भारत' प्रकल्प सध्या सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे जिल्ह्यात राबवत आहे. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी बालविवाह होताना दिसतात, त्यात धार्मिक स्थळांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे विवाह विधी पार पाडणाऱ्या ब्राह्मण, पंडित, मौलवी, धर्मगुरू यांना 'बालविवाह प्रतिबंध कायदा 2006'ची माहिती देऊन, प्रतिज्ञा घेऊन त्यांच्यामार्फतच बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती सर्वत्र पोहचवणार


  श्रीमती भोसले यांनी स्पष्ट केले की, 'बालविवाह प्रतिबंध कायदा'नुसार बालविवाह घडवून आणणे हा गंभीर गुन्हा आहे. केवळ मुलांचे पालकच नाही, तर विवाहासाठी मदत करणारे ब्राह्मण, मौलवी, वरातीत सहभागी होणारे लोक, मंडप सजावणारे, घोडेवाले, बँडवाले, फोटोग्राफर अशा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.


  बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या चाइल्ड हेल्पलाइनवर तक्रार करावी, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. तसेच पोलिसपाटील, स्थानिक पोलीस स्टेशन, महिला व बालविकास विभाग, बाल संरक्षण कक्ष किंवा सामाजिक संस्थांमार्फतही तक्रार नोंदवता येते, असेही त्यांनी सांगितले.


अक्षयतृतीयेच्या दिवशी विशेष मोहीम


  अक्षयतृतीयेच्या दिवशी सर्व धर्मगुरूंनी बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेऊन जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानंतर मंदिरांच्या आवारात व बाहेरील भिंतींवर बालविवाह प्रतिबंध कायद्याची वॉल पेंटिंग करण्यात येणार आहे. हा उपक्रम पुढील पंधरवडाभर संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यात येईल.


  या अभियानात जिल्हाधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, बाल कल्याण समिती, पोलीस अधीक्षक, बाल पोलिस पथक, पोलीस उपनिरीक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, ग्राम बालसंरक्षण समिती यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे.


  श्रीमती भोसले यांनी सांगितले की, बालविवाह रोखण्याचे काम केवळ कायद्याच्या अंमलबजावणीपुरते मर्यादित नसून, समाजाच्या सर्व घटकांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यासच भारत 2030 पर्यंत 'बालविवाहमुक्त' होईल. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)


(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)


तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम