धुळे दर्पण न्यूज :- पोस्ट खात्याच्या सेवांमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक नवा अध्याय सुरू झाला आहे. धुळे पोस्ट विभागाने पोस्ट ऑफिसमधील पारंपरिक व्यवहार प्रणालीत बदल करत पेपरलेस केवायसी प्रक्रिया, नवीन पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खाते उघडणे आणि आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे व्यवहार करण्याची सुविधा अधिकृतपणे सुरू केली आहे. याबाबतची माहिती धुळे विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर श्री. जी. हरी प्रसाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या नव्या प्रणालीमुळे आता नवीन ग्राहकांना खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजांच्या झंझटीत अडकावं लागणार नाही. फक्त आधार कार्ड आणि अंगठ्याचा ठसा (बायोमेट्रिक प्रमाणीकरण) पुरेसा ठरणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेद्वारे खाते काही मिनिटांत उघडले जाणार असून, कागदपत्र सादर करण्याची गरज संपुष्टात येणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
तसेच, सध्याचे खातेधारकही या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. विद्यमान ग्राहकांनी ई-केवायसी फॉर्म भरावा लागेल आणि त्यांच्या विद्यमान खात्याचे पुनः-केवायसी केल्यावर आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे कोणतेही व्यवहार करता येतील.
आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, जर एखादा खातेधारक पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष येऊन पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी येतो आणि त्या व्यवहाराची रक्कम रु. ५,००० किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर अशा व्यवहारासाठी कोणत्याही प्रकारचे व्हाउचर स्लीप भरण्याची गरज नाही. व्यवहार थेट बायोमेट्रिक प्रमाणीकरणाच्या आधारे पूर्ण केला जाईल.
ही प्रणाली केवळ सुविधा नव्हे तर सुरक्षा, विश्वासार्हता आणि पारदर्शकतेचा एक नवा मानदंड आहे. आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरणामुळे बनावट खात्यांची शक्यता कमी होणार असून, ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा फसवणुकीचा धोका राहणार नाही.
प्रवर अधीक्षक श्री. हरी प्रसाद यांनी सांगितले की, “पोस्ट खात्याच्या सेवा डिजिटल युगाशी सुसंगत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पेपरलेस व्यवहार, डिजिटल ओळख आणि सुरक्षित बँकिंग प्रणालीमुळे आमचा ग्राहक अधिक समाधानी होईल, असा विश्वास आहे.”
या नव्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिक, ज्यांच्याकडे बँकिंग सुविधा अत्यल्प आहेत, त्यांनाही सहज, सुरक्षित व सुलभ बँकिंग सेवा मिळू शकणार आहे. या उपक्रमामुळे डिजिटल इंडिया आणि फिनटेक समावेशन या दोन्ही उपक्रमांना चालना मिळणार आहे.
ग्राहकांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि पोस्ट खात्याच्या डिजिटल प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रवर अधीक्षकांनी केले आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
