धुळे दर्पण न्यूज :- केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन वक्फ कायद्याच्या निषेधार्थ उलेमा कौन्सिल महाराष्ट्र राज्याच्या वतीने 'बत्तीगुल आंदोलन' हा शांततामय आंदोलनाचा उपक्रम राबविण्यात आला. या आंदोलनाला राज्यभरातून तसेच धुळे शहरातूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. शहरातील मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये रात्री ९ वाजता पंधरा मिनिटांसाठी विजेचे दिवे बंद ठेवून नागरिकांनी या कायद्याविरोधात आपला संताप व्यक्त केला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  उलेमा कौन्सिलचे धुळे जिल्हाध्यक्ष मुफ्ती कासिम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडण्यात आले. या वेळी कोणताही आवाज, घोषणाबाजी किंवा मोर्चा न काढता, फक्त दिवे बंद ठेवून सरकारला विरोध दर्शवण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरातील व परिसरातील सर्व विद्युत उपकरणे आणि दिवे बंद ठेवून 'बत्तीगुल'च्या माध्यमातून आपला निषेध नोंदवला.

- Advertisement -
  या आंदोलनामागील उद्देश केंद्र सरकारच्या नव्या वक्फ कायद्यामधील काही कलमांबाबत असलेली अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त करणे हा होता. या कायद्यामुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि मालमत्तांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उलेमा कौन्सिलने या कायद्याला मुस्लीम समाजाच्या हक्कांवर घाला असल्याचे म्हटले असून तातडीने हा कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे.


  धुळे शहरातील नागिनावाडी, मल्ला कॉलनी, ताज नगर, इस्लामपुरा, काझी नगर, लोहियानगर, महात्मा फुले नगर, सुभान नगर, आजाद नगर अशा अनेक भागांमध्ये बत्तीगुल आंदोलन उत्स्फूर्तपणे पार पडले. नागरिकांनी आपल्या घरांतील दिवे बंद ठेवून सरकारकडून होणाऱ्या अन्यायकारक कायद्यांना विरोध दर्शवला.

- Advertisement -

  या आंदोलनामुळे कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची समस्या उद्भवली नाही. पोलिस प्रशासनाने देखील शांततेच्या मार्गाने पार पडणाऱ्या या आंदोलनाकडे सहकार्याने पाहिले. काही ठिकाणी स्थानिक समाजसेवक आणि धार्मिक नेत्यांनी समाजबांधवांना कायद्याचा भंग न करता निषेध नोंदवण्याचे आवाहन केले होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  उलेमा कौन्सिलने पुढील काळात अशा प्रकारचे अधिक व्यापक स्वरूपात आंदोलने होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मुस्लीम समाजातील विविध संघटनांनीही या कायद्याच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. सरकारने या कायद्यावर पुन्हा विचार करून मुस्लीम समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.


– सैय्यद सानिल

धुळे दर्पण

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -