धुळे दर्पण न्यूज :- शहराजवळील अन्वर नाला परिसरात बचत गटाचे पैसे जमा करून नेणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जबरदस्तीने हिसकावणाऱ्या टोळीचा छडा लावत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण २ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  ही घटना दि. ४ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास अन्वर नाला परिसरात घडली होती. फायनान्स कंपनीचा कर्मचारी आकाश छोटू कोळी हा बचत गटाकडून पैसे गोळा करून ते भारत फायनान्स प्रा. लि., मारोती नगर, चाळीसगाव रोड, येथे जमा करण्यासाठी जात असताना, मन्नत रेसिडेन्सीजवळ काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या मोटारसायकलला अडवून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी १ लाख ६५ हजार रुपये रोख व दोन टॅब जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

  या गुन्ह्याच्या तपासासाठी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरु केला होता. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. २२ एप्रिल रोजी वरखेडी रोडवरील डंपिंग ग्राउंड परिसरातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बादल रमेश रामकोर (२४, रा. वरखेडी चौफुली, धुळे) आणि आनंदा श्रावण सोनवणे (२०, रा. एकता नगर, अन्वर नाला जवळ, धुळे) अशी आहेत. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांनी हा गुन्हा आणखी तीन साथीदारांसह केल्याचे सांगितले.


  फरार आरोपींमध्ये रामदास ऊर्फ आप्पा छोटू पवार, अर्जुन बुधा मोरे (रा. मोराणे, मुंबई-आग्रा महामार्ग) आणि प्रविण नारायण शिंदे (रा. वरखेडी रोड) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून १ लाख ३५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल, ५० हजाराची दुसरी मोटारसायकल, ५ हजारांचा टॅब, आणि ४६ हजार ४०० रुपयांचा आयफोन असा एकूण २ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


  ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई अमरजीत मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, तसेच त्यांच्या पथकातील शशिकांत देवरे, मुकेश वाघ, दिनेश परदेशी, संतोष हिरे, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे, मेहेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, विनायक खैरनार, अमोल जाधव यांनी केली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

फरार आरोपींचा शोध सुरू असून, पोलीस तपास पुढे चालू आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -