धुळे दर्पण न्यूज :- “धुळे शहरात दिवसाढवळ्या गोळीबार होतो, तलवारी फिरतात, आणि तरीही पोलिस काहीच करत नाहीत. गुन्ह्याची तक्रार सुद्धा घेतली जात नाही. हे रामराज्य आहे की गुंडराज्य?” असा संतप्त सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. त्यांनी एका सविस्तर पत्रकाद्वारे धुळे पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  गोटे म्हणाले, “राहुल सानपच्या डोक्यात नऊ टाके पडले, तरीही त्याची तक्रार नोंदवली जात नाही. रोहित सानप नावाच्या तरुणावर झालेल्या जबर मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, गुन्हा दाखल होत नाही, ही काय परिस्थिती आहे?”


  त्यांनी पुढे म्हटले की, “सट्टा, मटका, गांजाची तस्करी, देशी कट्ट्यांचे व्यवहार, जमिनीच्या बोगस नोंदी, घरांवर जबरदस्तीने कब्जा, हे सर्व धुळे शहरात खुलेआम सुरू आहे. गुंड समाजात वावरत असूनही पोलिस त्यांना शोधत नाहीत. उलट पोलिस प्रशासन गुंडांनाच पोसते आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.”

- Advertisement -

  गोटेंनी थेट असा आरोप केला की, “पोलीस अधीक्षकांनी स्वतः मला विचारले होते, ‘सट्ट्याच्या पेढ्या कुठे आहेत?’ त्यावर मी त्यांना सांगितले की ज्या ठिकाणांहून तुमचेच पोलिस हप्ते उकळून आणतात आणि ज्याचा हिस्सा वरपर्यंत जातो, तीच ठिकाणे सट्ट्याच्या पेढ्या आहेत. जर ही माहिती तुम्हालाच नसेल, तर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टरपेक्षा कमी आहात.”


धुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर सवाल

  अनिल गोटे यांनी पोलिस प्रशासनावर टीका करताना असेही म्हटले की, “शहरात घरफोड्या होत आहेत, महिलांच्या अंगावरील मंगळसूत्रे हिसकावली जात आहेत, गुन्हेगार खुलेआम वावरत आहेत, तरी पोलिस फक्त 'अर्ज द्या, तपास करू' एवढेच सांगतात. मग आम्हीच जर काळजी घ्यायची असेल, तर पोलिसांचे पगार कशासाठी?”


गुन्हेगारांच्या आडून पोलीस प्रशासनाचे संरक्षण?

  गोटेंनी असा थेट आरोप केला की, “कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल न करणे म्हणजे पोलीस प्रशासन गुंडांचे रक्षण करत आहे का, याचा गंभीर विचार होणे आवश्यक आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे.”

- Advertisement -


गांजाची शेती, देशी कट्टे, तलवार युद्ध – सत्तेची छत्रछाया?

  गोटेंनी असेही उघडपणे म्हटले की, “मी चार वर्षांपूर्वी पुराव्यांसह सांगितले होते की वन खात्याच्या १५०० एकर जमिनीवर गांजाची शेती केली जात आहे आणि त्यामध्ये पोलिसांची भागीदारी आहे. पण त्यावर कोणीही कारवाई केली नाही.”

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

'रोहित सानप प्रकरणाची वस्तुस्थिती दडपली जात आहे' – गोटेंचा दावा

  गोटे म्हणाले की, “रोहित सानप याने स्वतः निवेदन देऊन वस्तुस्थिती सांगितली असून, माझ्या माहितीप्रमाणे ती १०० टक्के खरी आहे. तरीही पोलिस कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करत नाहीत, हे पोलीस-गुंड साटेलोट्याचे लक्षण आहे.”


धुळे पोलीस अधीक्षक काय करणार?

  अशा गंभीर आरोपांमुळे संपूर्ण शहरात संतप्त चर्चा रंगली आहे. पोलिस प्रशासनाने या आरोपांवर काय उत्तर देणार, आणि धुळेकरांना कायदा-सुव्यवस्थेचा किती विश्वास राहील, हे येणाऱ्या काळात ठरणार आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -