धुळे दर्पण न्यूज :- काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाच्या मनोबलात भर घालण्यासाठी धुळे शहरात शिवसेनेच्या पुढाकाराने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तब्बल दीडशे मीटर लांबीच्या तिरंग्यासह शहरात काढण्यात आलेली ही रॅली देशभक्तीचे प्रतिक ठरली. हजारो नागरिकांनी सहभाग घेत 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.


रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. शहरातील विविध समाजघटक, सामाजिक संस्था, महिला मंडळे, अल्पसंख्याक समाज, युवक संघटना यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. गांधी पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला.


शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली यशस्वी झाली. विशेष म्हणजे, भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महिलांनी बजावलेल्या भूमिकेचा सन्मान म्हणून या रॅलीमध्ये महिलांना नेतृत्वाची संधी देण्यात आली. भारती मोरे, सारिका पवार, धनश्री थोरात, तेजस्विनी गोसावी, ललिता शिंदे, प्रतिभा पाटील, मनीषा सोनार, रेखा माळी आदी महिलांनी तिरंगा रॅलीचे ध्वजवाहकपद भूषवले.


या रॅलीमध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे, हिलाल माळी, असीम कुरेशी, बबलू पठाण, इरफान पठाण, जिया अन्सारी, अनिल जगताप (तालुकाप्रमुख), गणेश चौधरी, अजय पाटील, अरविंद सुडके, सनी मोरे, सचिन बडगुजर, शेखर बडगुजर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला.


काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले, ज्यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले. या पार्श्वभूमीवर देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. याच संदर्भात, धुळेकर नागरिकांनी सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत एकतेचे दर्शन या रॅलीच्या माध्यमातून घडवले.


ही तिरंगा रॅली केवळ उत्सव नव्हती, तर ती एक प्रेरणादायी कृती ठरली. देशासाठी लढणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावण्याचा या रॅलीचा उद्देश निश्चितच साध्य झाला, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.