धुळे दर्पण न्यूज :- पुणे, राज्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी आणि शेतमालाच्या साठवणुकीसाठी अधिक सुरक्षित व आधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मोठे पाऊल उचलत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या साठवणूक क्षमतेत लक्षणीय वाढ करत, जागतिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि शास्त्रशुद्ध साठवणूक पद्धती राबविण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी ठोस धोरणात्मक घोषणा केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ संचालक मंडळाच्या बैठकीत रावल बोलत होते. या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
साठवणूक क्षमतेत वाढ आणि आधुनिकायनाचे नियोजन
सध्या राज्यात वखार महामंडळाकडे स्वमालकीची १७.२२ लाख मेट्रिक टन आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेवर ७.३३ लाख मेट्रिक टन क्षमतेची गोदामे असून, एकूण २४.५५ लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता उपलब्ध आहे. वाढत्या गरजांनुसार आणखी ५२ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेची गोदामे उभारण्याचे व्यवहार्य नियोजन सुरू करण्यात आले आहे. हे गोदाम अत्याधुनिक पद्धतीने आणि साठवणुकीच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बांधले जाणार आहेत.
![]() |
| - Advertisement - |
साठवणूक सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यातील सर्व गोदामांचे रेटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांतून व सवलतीतून राज्याला लाभ मिळू शकेल. तसेच गोदामामध्ये पारदर्शकता आणि नियंत्रण राखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली बसवण्यात येणार आहे, ज्यांचे नियंत्रण पुण्यातील मुख्यालयातून करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा – सवलती, विमा संरक्षण आणि तारण कर्ज
वखार महामंडळाच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. गोदाम साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना ५० टक्के व शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत दिली जाते. साठवलेला शेतमाल १०० टक्के विमा संरक्षणाच्या कक्षेत येतो आणि त्यावर तारण कर्ज घेणे शक्य होते.
हे बदल शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. साठवणुकीमुळे बाजारभाव कमी असताना शेतकरी माल विक्री टाळू शकतो आणि उच्च भावाच्या काळात माल विकून अधिक नफा मिळवू शकतो. त्यामुळे धान्य साठवणुकीमुळे अन्नधान्याचे नुकसानही टळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
जांबरगाव अॅग्रो लॉजिस्टिक पार्क : राज्यात नवा आदर्श प्रकल्प
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथे उभारण्यात आलेल्या अॅग्रो लॉजिस्टिक पार्कचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. या पार्कमध्ये १० हजार मेट्रिक टन क्षमतेचे सायलो, ६ हजार मेट्रिक टन क्षमतेची दोन गोदामे, क्लिनिंग व ग्रेडिंग युनिट (५ टन/तास), पेट्रोल पंप, ट्रक टर्मिनल, सामायिक सुविधा केंद्र, उपहारगृह, अंतर्गत रस्ते इत्यादी सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक साठवणूक सेवा, प्रक्रिया सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि कृषी व्यापारासाठी सुसज्ज पर्याय मिळणार आहे. तसेच लातूर जिल्ह्यात १० हजार मेट्रिक टन क्षमतेच्या सायलो प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होणार असल्याची माहितीही रावल यांनी दिली.
![]() |
| - Advertisement - |
शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न
वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये शेतमाल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये अधिक विश्वास निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहिमा, मार्गदर्शन शिबिरे आणि माहिती सत्रे आयोजित करण्याचेही नियोजन आहे. शास्त्रशुद्ध साठवणूक पद्धतीमुळे अन्नधान्य साठवणुकीची गुणवत्ता टिकवून ठेवणे शक्य होईल, जे शेतमालाच्या किंमतीसाठी महत्त्वाचे ठरेल.
शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल
राज्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल सुरक्षित, शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धतीने साठवला जावा, त्यांना योग्य बाजारभाव मिळावा, आणि त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी वखार महामंडळाच्या माध्यमातून उचललेले हे पाऊल राज्यातील कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारामुळे राज्यातील साठवणूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



