धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या कोट्यवधींच्या रोकड प्रकरणाने राज्यात राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणावर आता अंदाज समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाष्य करत संपूर्ण प्रकार ‘राजकीय हेतूनिशी रचलेलं नाटक’ असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा ठपका ठेवत सरकार आणि समितीला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा संशय व्यक्त केला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

"गोटे यांना आरोप करण्याची जुनी सवय" – खोतकरांचे प्रतिपादन

  मंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले की, “अनिल गोटे यांना अशा प्रकारचे बिनधास्त आरोप करण्याची सवय आहे. प्रत्येक वेळी राजकीय ताप वाढवण्यासाठी ते अशा गोष्टी घडवतात. हे आरोप खोटे आहेत. सरकार आणि अंदाज समितीच्या विश्वासार्हतेवर आघात करण्याचा हेतू यामागे आहे.”

- Advertisement -
"कुणीही आरोप करू शकतं, पण त्यात तथ्य पाहिजे"

  खोतकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, “कोणताही आरोप करणे सोपे आहे. पण त्या आरोपांमध्ये काही तथ्य असावं लागतं. ही एक पूर्वनियोजित योजना असून, त्यामागे राजकीय हेतू आहे.” त्यांनी सर्व आरोप साफ फेटाळले आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणं आवश्यक असल्याचे सांगितले.

- Advertisement -
"खोली किशोर पाटीलच्या नावावर नव्हती"

  खोतकर यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना स्पष्ट केलं की, “खोली क्रमांक 102 ही किशोर पाटील यांच्या नावावर नव्हती. मी स्वतः त्याच्याशी बोललो आहे. तो त्या खोलीत राहत नव्हता, तर दुसऱ्या खोलीत होता.” विरोधकांकडून खोटं पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.


राऊत-गोटे काय म्हणाले?

  या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी खोली क्रमांक 102 ही मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नावावर असल्याचा दावा केला. तर आमदार अनिल गोटे यांनी खोली किशोर पाटील यांच्या नावावर होती, ते खोतकरांचे पीए असल्याचं म्हटलं. तसेच या खोलीत अंदाज समितीतील 11 आमदारांना वाटण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड आणल्याचा गंभीर आरोपही गोटे यांनी केला.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

रात्रभर कारवाई, पहाटे सापडली रोकड

  या घटनेचं नाट्य रात्री उशिरा सुरू झालं. अनिल गोटे यांनी विश्रामगृहात ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत कारवाई झाली. पोलिस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोली क्रमांक 102 चं कुलूप कटरने तोडण्यात आलं. त्यानंतर खोलीतून एक कोटी ८४ लाख २०० रुपयांची रोकड सापडली असून, ती पोलिसांनी जप्त केली आहे.

- Advertisement -

राजकीय वातावरण तापले, चौकशीची मागणी

  या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं असून, विरोधकांनी सरकारवर आणि मंत्र्यांवर आरोपांचे तुफान सुरू केलं आहे. दुसरीकडे खोतकरांनीही हे सर्व आरोप राजकीय असून, त्याचा सत्याशी संबंध नाही, असे ठामपणे सांगितले. आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं आणि सत्य बाहेर येतं का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -