धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील सोनगीर शिवारात मंगळवारी (ता. २०) सकाळी गोरक्षकांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे कत्तलीच्या उद्देशाने होणारी गुरांची तस्करी उधळून लावण्यात आली. गोरक्षकांच्या मदतीला धावून आलेल्या पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, वाहन सोडून देण्याचा दबाव टाकणाऱ्या भाजप कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यासह तिघांविरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  ही घटना सोनगीर बसस्थानकाजवळ मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. गोराणे गावाकडून एक पिकअप वाहन (एमएच १८ एए ४०८५) सोनगीरच्या दिशेने गुरे घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी बसस्थानकाजवळ सापळा रचला. संबंधित वाहन आल्यानंतर गोरक्षकांनी त्याला थांबवले असता, त्यात गुरे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. या गुरांची तस्करी कत्तलीसाठीच होत असल्याचा संशय गोरक्षकांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

  दरम्यान, या पिकअप वाहनाच्या मागे ‘पायलेटींग’ करत आलेली कार (एमएच ०२ सीआर ८०६४) घटनास्थळी थांबली. त्या कारमध्ये असलेल्या व्यक्तींनी गोरक्षकांना पिकअप सोडून देण्याचे सांगितले. परंतु गोरक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष करताच, त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीने पिकअप वाहनासह त्यातील चालकाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी गुरे ताब्यात घेऊन मालेगाव रोडवरील गोशाळेत हलविली आहेत.


  पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंदाजे ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गुरे व पिकअप वाहन यांचा समावेश आहे. याप्रकरणी गोरक्षक कृष्णा अरुण माळी यांच्या तक्रारीवरून पिकअप चालक गोरख जिभाऊ मिल (रा. भामपूर ता. शिरपूर), भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी दिनेश जगन्नाथ कदम आणि त्याच्यासोबतचा रावण फुलपगारे (दोघेही रा. गोराणे ता. शिंदखेडा) यांच्याविरोधात प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर सोनवणे हे करीत असून, पुढील तपासासाठी अधिकाऱ्यांनी काही महत्वाची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, भाजप पदाधिकाऱ्याच्या सहभागामुळे राजकीय वर्तुळातही ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -