धुळे दर्पण न्यूज :- राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सध्या 'अजित पर्व' आणि 'युवक पर्व' या अभियानांद्वारे युवकांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी धुळ्यात व्यक्त केला.
कुसुंबा येथे होणाऱ्या युवक पर्व अभियानाच्या कार्यक्रमानिमित्त सूरज चव्हाण यांनी शहरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, प्रदेश सरचिटणीस सारांश भावसार, प्रा. शरद पाटील, अनिल मुंदडा, कुणाल पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक पर्व अभियानाबाबत माहिती देताना चव्हाण म्हणाले की, "या अभियानाद्वारे राज्यातील युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. जळगाव, नंदुरबार येथे हे अभियान यशस्वीपणे पार पडले असून आज धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे सभा होणार आहे. या माध्यमातून युवकांना पक्षाशी जोडून बुथस्तरावर कार्यकर्ता तयार करण्यावर आमचा भर आहे. सदस्य नोंदणीची पाहणी करत, निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना टार्गेटही दिले जातील."
महायुतीत निवडणूक लढण्याचा निर्णय सामूहिक
महायुतीतील स्थानिक निवडणुकांबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, "काही आमदार स्वबळावर लढण्याचे वक्तव्य करतात ते स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी असते. मात्र महायुतीतून निवडणूक लढायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित गट) या तिन्ही पक्षांचे नेते मिळूनच घेतील. तो निर्णय सर्वांना मान्य असेल."
"निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष"
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांना तिकीट देण्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अजितदादांकडे मागणी करणार आहे की युवकांना संधी द्यावी. मात्र उमेदवारीसाठी एकमेव निकष म्हणजे निवडून येण्याची क्षमता असेल. फक्त वय किंवा नाते संबंधावर नव्हे तर जनाधार पाहून तिकीट दिले जाईल."
सैनिक सन्मान रॅलीत राष्ट्रवादीचीही उपस्थिती
भाजपाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सन्मानासाठी होणाऱ्या रॅलीबाबत चव्हाण म्हणाले की, "देशहितासाठी राष्ट्रवादी पक्ष सर्वांबरोबर आहे. त्यामुळे अशा उपक्रमांमध्ये मानपान न बाळगता आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील. या ठिकाणी कोणताही अहंकार न ठेवता राष्ट्रीय हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे."
नव्या चेहऱ्यांना प्रवेश, पक्ष विस्ताराला गती
या कार्यक्रमात प्रा. शरद पाटील, अनिल मुंदडा आणि कुणाल पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याची माहिती देताना चव्हाण म्हणाले की, "अनेक नविन चेहरे पक्षात येण्यास उत्सुक आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांशी जोडलेला पक्ष असून येत्या काळात पक्षबांधणीला अधिक गती दिली जाईल."
