धुळे दर्पण न्यूज :- रविवार, १८ मे रोजी धुळे शहरातील मालेगाव रोडवरील आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठा राजकीय प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या (ठाकरे गट) आणि ओम शांती सोशल ग्रुपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या प्रवेश सोहळ्याचे नेतृत्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व ओम शांती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र मोतीराम अहिरे यांनी केले. त्यांच्यासोबत ३० ते ३५ पदाधिकारी आणि सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


  या वेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, ओमप्रकाश खंडेलवाल, माजी मंडळ अध्यक्ष बबनराव चौधरी, महेंद्र शेणगे, विनोद खेमनार, पवन जाजू आदी उपस्थित होते.

- Advertisement -

“जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही पक्षात आपले स्वागत” – आमदार अग्रवाल

  या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. देशभरात ११ कोटीहून अधिक सदस्य असलेला हा पक्ष सामान्य जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहे. नरेंद्र अहिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रवेश पक्षाच्या संघटनबळाला नवे बळ देणारा ठरेल.”


  ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील वंचित घटकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. याच कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेक सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. आता आपल्याला एकत्रितपणे शहराच्या विकासासाठी काम करायचं आहे.”


गजेंद्र अंपळकर यांची ग्वाही

  भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी आपल्या भाषणात नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “आपण आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आमदार अग्रवाल यांच्या पुढाकाराने रावेर एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग उभे राहत असून, त्यातून युवकांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

प्रवेशकर्त्यांमध्ये यांचा समावेश

  या वेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज खताळ, धुळे तालुका उपाध्यक्ष बळिराम पाटील, ओम शांती ग्रुपचे सचिव सोमनाथ चौधरी, मुकेश उपाध्याय, अशोक मराठे, सतीश अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रवेश केला.



क्रीडापटू जतीन वाडीले याचा सत्कार

  याच कार्यक्रमात मोराणे (ता. धुळे) येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयातील बारावीचा विद्यार्थी जतीन हरी वाडीले याचा आमदार अनुप अग्रवाल व गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


  जतीनने दोंडाईचा येथे झालेल्या जिल्हास्तरीय फ्लोरबॉल स्पर्धेत व चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळवले. तसेच पुणे व आग्रा येथे झालेल्या लॅक्रोस स्पर्धेत रजतपदक मिळवून राज्याचा मान उंचावला. नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेतही त्याने ८१ टक्के गुण मिळवले. त्याच्या यशाबद्दल पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम