धुळे दर्पण न्यूज :- “गुन्हेगारीचा बालेकिल्ला ओन्ली धुळे जिल्हा” असे ओरडत आणि गुन्हेगारीचा अभिमान बाळगणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, या प्रकाराची गंभीर दखल घेत धुळे जिल्हा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या 'रिल्स स्टार'ची हिरोगिरी उतरवली आहे. पोलिसांनी या तरुणास शोधून काढले आणि त्याच्याकडून सोशल मीडियावर हात जोडून माफी मागणारा दुसरा व्हिडीओ बनवून जनतेसमोर सादर केला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या तरुणाने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये तो धुळे जिल्ह्याला "गुन्हेगारीचा बालेकिल्ला" संबोधत होता. गुन्हेगारीचा सन्मान करत, आपल्याला गुन्हेगारीची प्रतिष्ठा असल्याचे सांगणाऱ्या या व्हिडीओमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

- Advertisement -

  धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, तात्काळ या व्हिडीओचा स्त्रोत शोधून काढला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने चुकीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून माफीनामा व्हिडीओ तयार करून घेतला, ज्यात तो समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे व्हिडीओ कधीही न करण्याचे वचन देतो आणि "गुन्हेगारी नाही, कामधंदा करा" असे आवाहन करतो.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पोलीसांचा इशारा – गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्यास कडक कारवाई

  धुळे जिल्हा पोलीस सोशल मीडियावर बारकाईने नजर ठेवून आहेत. समाज माध्यमांवर गुन्हेगारी, भाईगिरी, दहशत व हल्लेखोर प्रवृत्तींना महिमामंडित करणाऱ्या रिल्स, व्हिडीओज आणि पोस्ट्स यावर लक्ष ठेऊन अशा प्रकारांवर तात्काळ कारवाई केली जात आहे.


  या प्रकरणामुळे जिल्ह्यातील तरुणाईसमोर एक संदेश गेला आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन दिल्यास, कायद्याची कडक कारवाई भोगावी लागेल.


  धुळे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "गुन्हेगारीची प्रतिष्ठा मिरवणाऱ्यांची सोज्वळ नागरिकांमध्ये जागा नाही. कायद्याचा आधार घेऊन समाजात शांतता व सुव्यवस्था राखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे. मात्र, कायदा तोडणाऱ्यांना शिक्षा नक्कीच मिळेल."

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम