धुळे दर्पण न्यूज :- कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने धुळ्यात १७ मेपासून अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात २५ मे रोजी "कान्हदेश वारकरी रत्न" आणि "कान्हदेश वारकरी भूषण" हे मानाचे पुरस्कार राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार व राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या भव्य संकिर्तन सप्ताहाची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, संकिर्तन सप्ताह १७ मे ते २५ मे या कालावधीत कॉटन मार्केटमागील प्रसन्न हनुमान मंदिर, पवन नगर येथे आयोजित करण्यात आला असून, दररोज सायंकाळी ८ ते १० या वेळेत विविध किर्तनकारांचा कीर्तन सोहळा पार पडणार आहे.

- Advertisement -

  सप्ताहाच्या दररोजच्या कार्यक्रमात देशभरातील नामवंत कीर्तनकारांची रसाळ वाणी भक्तजनांना लाभणार आहे. त्यात ह.भ.प. सुदर्शन महाराज गायकवाड (गोंदूर), ह.भ.प. आनंददासजी महाराज (कजवाडेकर), ह.भ.प. अमृताश्रम स्वामी महाराज (राजुरी बीड), ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख (अमरावती), ह.भ.प. सुनिलजी महाराज झांबरे (आष्टी), ह.भ.प. महादेव महाराज राऊत (बीड), ह.भ.प. मुकुंदकाका महाराज (जाटदेवळेकर), आणि ह.भ.प. दिनानाथ महाराज सावंत (नामपूर) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा

  या कीर्तनांपूर्वी दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ होणार असून, रात्रौ ९ ते ११ या वेळेत महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. या कार्यक्रमात धुळे, शिरपूर, शहादा, नंदुरबार, साक्री, तळोदा या ठिकाणांतील भजनी मंडळांचा मोठा सहभाग असणार आहे.


सन्मानाने गवसलेले पुरस्कार – वारकरी रत्न व भूषण

  २५ मे रोजी संकिर्तन सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ह.भ.प. डॉ. भगवान महाराज (आनंदगड, जालना) यांना "कान्हदेश वारकरी रत्न" पुरस्कार आणि ह.भ.प. यशवंत महाराज कमळगावकर यांना "कान्हदेश वारकरी भूषण" पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास महंत प्रणवगिरी महाराज, महंत तुषारजी भोसले, सौ. यशोदा आक्का, उद्धव महाराज संजय धोंडगे आदी श्रद्धास्थान व प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे.


राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

  या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, आ. राजवर्धन कदमबांडे, आ. राघवेंद्र भदाणे, आ. काशिराम पावरा, आ. मंजुळा गावीत, माजी आ. कुणाल पाटील, माजी आ. संभाजी पाटील, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर सौ. जयश्री अहिरराव, प्रदीप कर्पे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, उमेश चौधरी, संजय अग्रवाल, कुमार मराठे, प्रविण अग्रवाल, विनायक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


कान्हदेश नावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

  या पत्रकार परिषदेत आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्टपणे म्हटले की, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या भागाला ऐतिहासिकदृष्ट्या ‘खान्देश’ असे संबोधले जात असले तरी प्रत्यक्षात हा ‘कान्हदेश’ आहे. त्यामुळे विधानसभेत "खान्देश"च्या ऐवजी "कान्हदेश" असे नामकरण व्हावे यासाठी आवाज उठविणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम