![]() |
| - Advertisement - |
मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची एमएच २२ बीसी ८८०८ क्रमांकाची कार कालिका देवी मंदिर परिसरातून देवपूरकडे जात होती. कारचा चालक काशिनाथ धुरगांडे (वय ३५, रा. अमरावती) हा आपला मित्र देवपूर परिसरात राहतो, त्याला भेटण्यासाठी धुळे शहरात आला होता. शहराची माहिती नसल्याने त्याने गुगल मॅपचा वापर करत मार्ग शोधत होता.
दुपारी अंदाजे १ वाजेच्या सुमारास पुलावरून जात असताना गुगल मॅपकडे पाहत असताना क्षणभर लक्ष विचलित झाले आणि भरधाव वेगातील कार अचानक अनियंत्रित झाली. काही कळण्याच्या आत कारने थेट पुलाच्या कठड्याला धडक दिली आणि काही सेकंदांतच ती नदीपात्रात कोसळली. जोरदार आवाज होताच परिसरात घबराट उडाली. आसपासच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले.
![]() |
| - Advertisement - |
अपघातात कारमधील चालक धुरगांडे गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ वाहतूक नियंत्रणात आणली आणि कार नदीतून बाहेर काढण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. या घटनेमुळे पुलावर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.
सतर्कतेचा अभाव महागात पडला!
ही घटना केवळ अपघात नसून, वाहने चालवताना मोबाईलचा वापर किती धोकादायक ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण ठरली आहे. गुगल मॅपचा वापर करत असताना सतत स्क्रीनकडे पाहण्यामुळे चालकाचे लक्ष गमावले गेले आणि काही सेकंदात गंभीर अपघात घडला. वाहनचालकांनी मार्ग माहीत नसला, तरी वाहन चालवताना मोबाईलकडे दुर्लक्ष न करता, सुरक्षित ठिकाणी थांबून मार्ग पाहावा, अन्यथा अशा घटना पुन्हा घडू शकतात.
दरम्यान, या प्रकरणी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलिस करत आहेत.
मुख्य संपादक:- सैय्यद सानिल
वृत्तसंपादकः - सैय्यद मुबश्शिर अली | धुळे दर्पण

.jpg)
