धुळे दर्पण न्यूज :-  धुळे जिल्ह्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाने आपली रणनिती ठरवण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत हे उद्या शनिवार, दिनांक ३१ मे रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, पक्ष पदाधिकारी, शिवसैनिक व विविध आघाड्यांतील प्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

हा संवाद कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता, हॉटेल ऋतुराज, रेल्वे स्थानक रस्त्यालगत, रामनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या संवादात पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यक्रमात शिवसेना उपनेते व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अशोक पात्रक, उपनेते अद्वय हिरे, उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार अनिल गोटे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे, महापौर भगवान करणकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, प्रशांत भदाणे, विजय वाघ, तेजस गोटे, नगरसेविका ज्योत्सना पाटील, प्रयुद्ध पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

त्यानंतर सायंकाळी ५.०० वाजता गुलमोहर विश्रामगृह, संतोषी माता चौक येथे खासदार राऊत पत्रकार व मीडियाशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते निवडणुकांविषयी पक्षाची भूमिका, केंद्रातील राजकारण व महाराष्ट्रातील घडामोडींवर आपले मत मांडण्याची शक्यता आहे.

या शिवसंवाद कार्यक्रमात युवा सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना, शिक्षक सेना, आरोग्य सेना, ग्राहक संरक्षण आघाडी, विधी न्याय सेना, कामगार सेना यांचे जिल्हा आणि महानगर पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, या कार्यक्रमासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महानगर प्रमुख धीरज पाटील, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, युवा सेना पदाधिकारी हरिष माळी, गुम्माल कानकाटे, मनोज जाधव, सिध्दार्थ करकाळ, महिला आघाडीच्या संगिता जोशी, जयश्री वानखेडे, तारका विवरेकर, अरुणा मोरे, तसेच विधी सेनेचे अॅड. जगदीश माळी, वाहतूक सेनेचे भूषण पाटील, आणि इतर असंख्य शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी या संवादासाठी सज्ज झाले आहेत.

सदर दौऱ्यामुळे धुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या (उबाठा) गोटात चैतन्य निर्माण झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील संघटनात्मक ताकद आणि एकात्मता दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.