धुळे दर्पण न्यूज :- फक्त आठ रुपयांची अतिरिक्त रक्कम ग्राहकाकडून आकारल्यामुळे धुळे जिल्ह्यातील एका दुकानदाराला तब्बल १५ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा ठोस निर्णय दिला आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे, तर ग्राहक हक्कांच्या जागरूकतेचा एक ठळक नमुना समोर आला आहे.
![]() |
| - Advertisement - |
काय घडलं नेमकं?
कैलास भदाणे (रा. दिधावे, ता. साक्री) हे ग्राहक धुळे शहरातील आशापुरी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कोल्ड्रिंक्स या दुकानात अमूल कंपनीचे २० ग्रॅम वजनाचे श्रीखंड खरेदी करण्यासाठी गेले. त्यावर छापील MRP होती ५२ रुपये, मात्र दुकानदार हेमंत भामरे यांनी ६० रुपये घेतले. भदाणे यांनी अधिक रक्कम का घेतली याबाबत विचारणा केली असता कुलिंग चार्जेस असल्याचे उत्तर दुकानदाराने दिले.
यावर पक्क्या बिलाची मागणी केली असता दुकानदाराने पावती देण्यास नकार दिला. यानंतर ग्राहक कैलास भदाणे यांनी भाजप ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. चंद्रकांत येशीराव यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
आयोगाचा ठोस निर्णय
२९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा नीता देसाई व सदस्या अॅड. रसिका निकुंभ यांनी दुकानदाराच्या कृतीस दोषी ठरवत कठोर निर्णय दिला.
त्यामध्ये खालील आदेश देण्यात आले:
- ग्राहकाकडून घेतलेले ८ रुपये व्याजासह परत करणे
- मानसिक त्रासपोटी १०,००० रुपये नुकसानभरपाई
- तक्रार अर्जावरील खर्चासाठी ५,००० रुपये
याप्रमाणे एकूण १५,००० रुपये दुकानदाराने ग्राहकाला अदा करावेत, असे आदेशित करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
या पार्श्वभूमीवर अॅड. चंद्रकांत येशीराव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून अनुचित व्यापारी प्रथा थांबवाव्यात, अशा मागण्या केल्या. वैधमापन शास्त्र विभागामार्फत सर्व दुकानांमध्ये एमआरपी संदर्भातील स्पष्ट फलक लावणे बंधनकारक करावे, तसेच अधिक दर आकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमूद आहे.
![]() |
| - Advertisement - |
ग्राहकांमध्ये जागृतीची गरज
या प्रकरणामुळे ग्राहकांनी आपले हक्क ओळखून योग्य वेळी तक्रार केल्यास कायद्याच्या आधारे न्याय मिळू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला वस्तूची खरेदी निश्चित दरात मिळण्याचा हक्क आहे. व्यापाऱ्यांनी याचा भंग केल्यास त्यांना यापुढे जबाबदारीने वागावे लागेल.
आपणही अशाच प्रकारच्या फसवणुकीचा बळी ठरलात का?
तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) – १९१५ वर संपर्क साधा किंवा www.consumerhelpline.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.
( मुख्यसंपादक – सैय्यद सानिल, धुळे दर्पण)


