लेखिका : सीमाताई मराठे,
धुळे. मो. 9028557718
सदर : दृष्टिकोन
धुळे दर्पण न्यूज :- राजकारण ही फक्त सत्तेची खेळी नसते. ती एक मानसिक डावपेचांची साखळी असते. या खेळात बरोबरीचा आणि वेळेवरचा एकही हलकी चालही कधी कधी दुसऱ्याच्या पायाखालची जमीन सरकवू शकते. अलीकडच्या घटनांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण म्हणजे एकमेकांच्या राजकीय वकुबाची, जनमानसातील प्रतिमेची आणि सत्तेच्या एकंदर शिल्लकीची परीक्षा आहे. यात सध्या कोण कमकुवत ठरतो आहे, कोण बळकट बनतो आहे, हे दिसून येतंय ते स्पष्टपणे आणि संयमाने.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांवर झालेले गंभीर आरोप, प्रसंगी माध्यमांमध्ये गाजलेली दृश्यं, यामुळे दोघांचीही प्रतिमा जनतेच्या मनात पोखरत आहेत. हे आरोप निव्वळ वैयक्तिक पातळीवरचे नाहीत. तर ते दोघांच्या नेतृत्व क्षमतेवर थेट प्रहार करणारे आहेत. *विशेषतः शिंदे गट आणि अजित पवार गट हे नुकतेच भाजपच्या छत्रछायेखाली आलेले, सत्ता स्थापनेत निर्णायक घटक झालेले गट असल्यामुळे त्यांच्यावरील या आरोपांकडे संपूर्ण महाराष्ट्र साशंक नजरेने पाहतो आहे.* शिंदे गटाने बंड करून शिवसेना फोडली. पवार गटाने थेट राष्ट्रवादीचा पाया हादरवला आणि आता दोघांच्याही गटातील आमदारांचे नाव गैरप्रकारांत येणे, ही गोष्ट राजकीयदृष्ट्या धोक्याची ठरू शकते. या आरोपांमधून जे चित्र उभं राहिलंय, ते शिंदे आणि पवार यांच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणारं आहे. आणि या गडबडीत एक पक्ष पूर्णपणे निष्पाप असल्यागत बाजूला उभा आहे तो म्हणजे भाजप.
![]() |
| - Advertisement - |
या पार्श्वभूमीवर भाजप मात्र कमालीचा संयम राखतो आहे. या वादात त्यांच्या आमदारांचं नाव नाही. प्रतिक्रिया नाही. आणि प्रत्यक्ष समर्थनही नाही. ही *‘निष्क्रिय क्रियाशीलता’* म्हणजे भाजपच्या रणनीतीचं सर्वोच्च उदाहरण आहे. भाजपने शिंदे आणि पवार या दोघांना सत्तेत स्थान दिलं असलं, तरीही ते त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहिलेला नाही. याचं प्रत्यंतर या स्थितीने दिलं आहे. म्हणजे, शिंदे किंवा पवार गट कधीही कमकुवत झाला तरीही सत्ता ढासळणार नाही, हे भाजप अधोरेखित करू पाहतोय.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडची वक्तव्यं ही याच पृष्ठभूमीवर पाहायला हवीत. *त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर संवाद कुशलतेचा अभाव आहे असं जाहीरपणे म्हटलं,* आणि लगेच माफीही मागितली. ही माफी खरंच माफी होती का? की तो आणखी एक डावपेच होता? हे महत्त्वाचं आहे. फडणवीस यांची ही माघार म्हणजे एखाद्या बुद्धिबळाच्या पटावरील प्यादं मागे घेतल्यासारखी चाल होती. समोरच्याला वाटावं की चूक मान्य झाली आहे. पण प्रत्यक्षात ती एक चतुरतावाच झाकलेली घावपात होती.
![]() |
| - Advertisement - |
या सगळ्या खेळात एक स्पष्ट गोष्ट समोर येते, शिंदे आणि पवार यांची प्रतिमा सध्या मोठ्या झपाट्याने गळतीला लागली आहे. आणि भाजप हे सावध खेळून त्याचा पूर्ण राजकीय लाभ उचलतो आहे. ही राजकीय गळती म्हणजे केवळ माध्यमांमध्ये होणारा आवाज नाही. तर जनतेच्या मनात निर्माण होणारी विश्वासाची उणिव आहे. या उणीवेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचं पारडं जड होईल, ही शक्यता फारशी अनैसर्गिक वाटत नाही. भाजपने येत्या काळात स्वबळाची तयारी केली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील आपली संघटनशक्ती आणि मतदारांवरील प्रभाव याची चाचपणी करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महायुतीतील भागीदार असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटाच्या तुलनेत चाचपणीही सुरू केली आहे. त्यामुळे मित्रपक्षांशिवाय स्थानिकच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना काय परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज बांधला जात आहे."
शिंदे आणि पवार यांचं राजकारण सध्या *'दिलेल्या शब्दाला जागण्याचा' किंवा 'सत्तेसाठी तडजोड करण्याचा'* या दोन ध्रुवांवर झुलत आहे. यातून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व अधिकाधिक धुसर होत चाललं आहे. हे दोघंही आता 'आपलं ठरवायचं आपलं उरणार नाही' अशा राजकीय समीकरणात अडकले आहेत. भाजपची ही भूमिका म्हणजे संधी मिळताच धाव घेणारा शेर आहे. गप्प असूनही भक्ष्यावर नजर ठेवणारा. आणि सध्या हे भक्ष्य म्हणजे त्यांच्या सत्तासमवेत वाटा घेतलेले 'सहकारी', जे प्रत्यक्षात त्यांच्या खेळाचे प्यादे ठरू लागले आहेत.
![]() |
| - Advertisement - |
शिंदे आणि पवार यांचं राजकीय वजन त्यांच्या 'गटां'वर आहे. त्यांच्या आमदारांच्या निष्ठांवर आहे. पण या निष्ठा *‘सत्तेमुळे टिकलेल्या’* असतील तर सत्तेच्या रेषा बदलल्या की त्या निष्ठाही बदलण्याची शक्यता असते. *याचा अर्थ, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार जर राजकीयदृष्ट्या कमकुवत झाले, तर त्यांचे अनुयायीही दुसऱ्या दिशेने वळू शकतात. भाजपला हे माहीत आहे.* आणि त्यामुळेच भाजप हे गट संपवण्याची गरज न पडता त्यांची ताकद 'निरुपद्रवी' करण्याच्या प्रयत्नात आहे. हे अजेंडा कोणाच्या मुखातून नाही, तर त्यांच्या कृतीतून समजतो.
सत्ता ही संख्येच्या आधारावर चालते, पण प्रभाव हा प्रतिमेच्या जोरावर वाढतो. शिंदे आणि पवार यांची संख्या असली, तरी सध्या प्रतिमा गमावत चालली आहे. आणि भाजपकडे विशेषतः फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही प्रतिमा बळकट होत चालली आहे. या स्थितीचा उपयोग भाजप करणारच. हे एक प्रकारचं 'सत्तासमीकरणातील पुनर्रचना' आहे. ‘पार्टनरशिप’ टिकवायची, पण सहकाऱ्यांची ताकद शक्य तितकी आटवायची. या नीतीने खेळल्यास, राजकीय आघाडीवर नेतृत्व कायम राखणं सोपं होतं.
२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडतंय, त्यात एका गोष्टीचा सातत्याने प्रत्यय येतो की, सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी भाजप कोणतीही आघाडी तोडू शकतो. कोणतीही नवी आघाडी बांधू शकतो. आणि आवश्यक वाटल्यास सोबतीही संपवू शकतो. २०१९ मध्ये शिवसेनेसोबतचं नातं तोडून त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट सिद्ध केली. नंतर फडणवीस-अजित पवार शपथविधी ड्राम्यात त्यांनी दुसऱ्यांदा तीच रणनीती उघड केली. आणि आता, सत्तेत असलेल्या दोघा उपमुख्यमंत्र्यांना हळूवारपणे गढूळ करत, स्वतःच्या प्रतिमेवर एकही डाग लागू न देता भाजप स्वतःला सिद्ध करत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न उभा राहतो. शिंदे आणि पवार राजकीयदृष्ट्या किती वाचतील? याचं उत्तर वेळ देईल. पण सध्याचं वास्तव सांगतं की, ते दोघंही हळूहळू भाजपच्या राजकीय आखाड्यात *‘मूल्य नसलेली किंमत’* बनत आहेत. आणि या सगळ्या डावपेचांच्या पार्श्वभूमीवर उभा राहतो तो एक झापडलेला प्रश्न? फडणवीस खरंच मागे आहेत का? की हा सर्व खेळ त्यांच्या शांत चेहऱ्यामागे घडतो आहे? उत्तर स्पष्ट आहे. राजकारणात शांतता ही अनेकदा रणशिंगाच्या सुरुवातीची खूण असते.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
.jpg)


