धुळे दर्पण न्यूज :- छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी रुग्णालय) अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची बदली धुळे येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश नुकतेच निर्गमित झाले असून, डॉ. सुक्रे हे ही बदली रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
डॉ. शिवाजी सुक्रे हे वैद्यकीय शिक्षणात तसेच रुग्णालय प्रशासनात मोठा अनुभव असलेले अधिकारी आहेत. त्यांनी परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी घाटी रुग्णालयात अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, रुग्णालयात अनेक सुधारणा राबविण्यात आल्या. रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यावर त्यांनी विशेष भर दिला होता.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मात्र अलीकडेच, घाटी रुग्णालयाच्या अभ्यागत समितीच्या बैठकीत डॉ. सुक्रे यांच्या कार्यपद्धतीवर टीका झाली. खरेदी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले. याबाबत अभ्यागत समितीचे अध्यक्ष आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून डॉ. सुक्रे यांची बदली करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर शासनाने तातडीने निर्णय घेत डॉ. सुक्रे यांची बदली धुळे येथे केली.
![]() |
| - Advertisement - |
दरम्यान, घाटी प्रशासनाने या आरोपांवर जोरदार प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, काही अभ्यागत समिती सदस्यांना कंत्राटी कामांमध्ये संधी न दिल्यामुळे वैयक्तिक द्वेषातून हे आरोप करण्यात आले आहेत. प्रशासनाने खरेदी प्रक्रिया पारदर्शक रित्या केली असल्याचा दावा केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सुक्रे हे स्वतः घाटी रुग्णालयातून शिक्षण घेऊन याच संस्थेत वैद्यकीय अधीक्षक पदापासून अधिष्ठाता पदापर्यंतची वाटचाल केलेले अधिकारी आहेत. त्यामुळे घाटी रुग्णालय आणि त्यांचे नातं अतूट आहे. सध्या जरी त्यांची बदली धुळे येथे झाली असली तरी ते पुन्हा घाटीतच सेवा देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे समजते.
![]() |
| - Advertisement - |
या घडामोडींमुळे घाटी रुग्णालयात वर्तणूक, कामकाज पद्धती आणि शासकीय बदल यावर नव्याने चर्चा रंगू लागली आहे. पुढील काही दिवसांत डॉ. सुक्रे यांच्या बदली संदर्भात अंतिम निर्णय होणार का, याकडे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


