धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक सामूहिक बलात्कार प्रकरणात न्यायालयानं कठोर निर्णय घेत, पाच नराधमांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांच्या न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत, दोषी आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
❖ घटनेचा थरकाप उडवणारा तपशील
ही धक्कादायक घटना ३ जून २०२३ रोजी साक्री तालुक्यातील एका दुर्गम पाड्यावर घडली होती. पीडित बालिका आपल्या आजी आणि लहान भावांसोबत शेतातील झोपडीसदृश्य घरात राहत होती. रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आल्यानंतर दबा धरून बसलेल्या पाच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींची नावे अशी आहेत:
- किशोर पंडीत सुर्यवंशी
- छोटू उर्फ प्रशांत रतीलाल बागुल
- चेतन भटू बागुल
- संदेश रामदास साबळे
- जयेश सुर्यवंशी
![]() | |
|
पीडितेच्या आजीनं दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ जून २०२३ रोजी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO), भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
❖ तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया
तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक रोशन व्ही. निकम यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी सर्व आरोपींना तत्काळ अटक केली व गुन्ह्यात वापरलेलं साहित्य जप्त केलं. संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास करून, त्यांनी वेळेत आरोपपत्र न्यायालयात सादर केलं.
या प्रकरणाच्या सुनावणीत एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात पीडितेची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉ. वैशाली शिरसाठ, डीएनए तज्ज्ञ विक्रम ढेरे, शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र जाधव, तपासी अधिकारी रोशन निकम आदींचा समावेश होता. परिस्थितीजन्य पुरावे आणि पीडितेच्या स्पष्ट साक्षीमुळे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवलं.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचं मार्गदर्शन मिळालं. तसेच महिला पैरवी अधिकारी सुशिला वळवी आणि दत्तू सुर्यवंशी यांनीही सहकार्य केलं.
❖ न्यायालयाचा कठोर निर्णय
विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांनी या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेत, समाजात योग्य संदेश जावा यासाठी सर्व पाच आरोपींना जन्मठेप, प्रत्येकी ₹10,000 चा दंड आणि दंड न भरल्यास 2 महिन्यांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.
![]() |
| - Advertisement - |
❖ समाजात संतापाची लाट; शिक्षा म्हणजे पीडितेच्या न्यायाचा विजय
या घटनेमुळे साक्री तालुक्यात तसेच संपूर्ण धुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला होता. अनेक ठिकाणी आंदोलने, निषेध मोर्चेही काढण्यात आले होते. अखेर न्यायालयानं दिलेल्या कठोर शिक्षेने समाजात दिलासा निर्माण झाला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ही शिक्षा केवळ त्या बालिकेसाठी न्याय मिळवणारी नाही, तर अशा कृत्यांना रोखण्यासाठी समाजाला इशारा देणारी आहे. न्यायालयाने दाखवलेली कठोरता ही इतर नराधमांसाठी धडा ठरणारी आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.



