धुळे दर्पण न्यूज :- गेल्या काही आठवड्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या धुळेकरांसाठी गुरुवार, 26 जून २०२५ रोजीचा दिवस सुखद ठरला. आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने अखेर हजेरी लावत शहराला चिंब भिजवले. या हंगामातील खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांना प्रथमच रेनकोट आणि छत्रीचा वापर करावा लागला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
उकाड्यानंतर दिलासा
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच धुळे शहरात ढगाळ वातावरण आणि दमट हवा निर्माण झाली होती. मात्र समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम होती. या आठवड्याच्या सुरुवातीपासून उष्मा वाढल्याने तापमानातही झपाट्याने वाढ झाली होती. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी व्यापले आणि काही वेळातच संततधारेने शहरावर झोडपून काढले. हा पाऊस थांबत-थांबत सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू होता.
![]() |
| - Advertisement - |
रस्त्यांवर पाणीच पाणी
या संततधारेमुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले. फुलवाला चौक, गल्ली क्रमांक चार, राणा प्रताप चौक, प्रांताधिकारी कार्यालय मार्ग, नेहरु नगर, सुभाष रोड आदी ठिकाणी खोलगट भागात पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागली. सार्वजनिक वाहतूकही काही वेळ अडथळ्यांमुळे विस्कळीत झाली होती.
नागरिकांची धावपळ
पावसाच्या अचानक आगमनामुळे अनेकजण भिजून गेले. ऑफिसमध्ये, बाजारात गेलेले नागरिक अचानक आलेल्या पावसाने भिजून रस्त्याच्या बाजूने उभे राहून थांबावे लागले. काहींनी टपोऱ्या थेंबांचा आनंद घेत पावसात भिजण्याचा अनुभव घेतला, तर काहींनी दुकानदारांकडून छत्री आणि रेनकोट विकत घेतले. शहरातील छत्री विक्रेत्यांची चलती दिसून आली.
हवामान विभागाची माहिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी धुळे शहरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. आर्द्रतेचे प्रमाण तब्बल ९३ टक्के होते. गेल्या २४ तासांत ३० मिमी पावसाची नोंद झाली असून येत्या काही दिवसांत पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
![]() |
| - Advertisement - |
शेतीसाठी लाभदायक सुरुवात
पावसाने शेतीची कामे खोळंबलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला आहे. या पावसामुळे खरिपाच्या पेरणीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी खात्याचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी आता आगामी दिवसांत सतत व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.



