जयहिंद कॉलनी, धुळे – स्टेट बँक ऑफ इंडिया प्रमोदनगर शाखेतील प्रकार खळबळजनक

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील जयहिंद कॉलनी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (प्रमोदनगर शाखा) येथे मराठी भाषिक प्राध्यापिकेला हिंदी भाषिक ब्रँच मॅनेजरने मराठी भाषेवरून हिणवले आणि अपमानजनक वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवरच शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

प्राध्यापिकेला ‘दरोडेखोर’ म्हणत भाषिक अपमान

प्राप्त माहितीनुसार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या इंगळे या महिला प्राध्यापिका काही कामानिमित्त प्रमोदनगर येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेल्या होत्या. मात्र बँकेची वेळ संपली असल्याचे साध्या शब्दांत सांगण्याऐवजी शाखेचे मॅनेजर गांधी यांनी इंगळे यांच्याशी हिंदीत आक्रमक पद्धतीने बोलण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्यांना "दरोडा घालायला आला आहात का?" असे म्हणत मराठी भाषेचा अवमान करत अपमानास्पद वागणूक दिली.

- Advertisement -

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्राध्यापिका इंगळे यांनी त्यांची बाजू ठामपणे मांडत गांधी यांना जाब विचारला. परिणामी दोघांनीही 112 क्रमांकावर संपर्क साधत तक्रार दाखल केली आणि हा वाद थेट देवपूर पोलीस ठाण्यात पोहोचला.

शिवसैनिकांनी उचलली अस्मितेची जबाबदारी

घटनेनंतर चार दिवसांनी इंगळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी व महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर शिवसैनिकांचा एक गट संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचला. त्यावेळी शाखा मॅनेजर गांधी अनुपस्थित होते. मात्र, घटनाक्रमात सहभागी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना शिवसैनिकांची वादावादी झाली. यामध्ये एका कर्मचाऱ्याने शिवसैनिकांना उद्देशून अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याचा आरोप आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले व दोघा शिवसैनिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचे सांगण्यात येते.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

पोलिसांची भूमिका संशयास्पद

हा वाद पुन्हा देवपूर पोलीस ठाण्यात पोहोचला. इंगळे यांनी बँकेच्या मॅनेजरने आणि कर्मचाऱ्याने अपमानजनक शब्दांत वागल्याची तक्रार दिली. तर दुसरीकडे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी "शासकीय कामात अडथळा आणला आणि मारहाण केली" अशी तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी दिलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारण्यास नकार दिला आणि काही वेळा बाचाबाची झाली.

या सगळ्या घडामोडीत सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला दोन्ही बाजूंचा समजुतीचा प्रयत्न सुरू असताना बँकेच्या संबंधितांना अज्ञात व्यक्तींकडून फोन येऊ लागले. या फोननंतर पोलीस अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला व शिवसैनिकांवरच गुन्हा दाखल करण्यात आला. काहींना रात्रीतून पोलीस ठाण्यातच थांबण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

मराठी अस्मिता की राजकीय द्वेष?

या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत –

  • मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आवाज उठवणाऱ्यांनाच गुन्हेगार का ठरवले जात आहे?
  • बँक व्यवस्थापनाच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करत आहे का?
  • अज्ञात व्यक्तींच्या फोननंतर पोलीसांची भूमिका का बदलली?

शिवसैनिकांनी स्पष्ट केले की, त्यांनी कोणतीही राजकीय उद्देशाने कारवाई केली नसून एका मराठी महिलेला झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून संबंधित बँक अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम