सात-बारासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या बंटी मासुळेंच्या कार्याला आमदार अनुपभैय्यांचे साथ; मिल परिसरातील रहिवाशांना दिलासा
धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील ऐतिहासिक मिल परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सातबारा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, यामध्ये माजी नगरसेवक बंटी मासुळे यांचा पाठपुरावा आणि आमदार अनुप अग्रवाल यांचे मंत्रालयस्तरावरचे प्रयत्न निर्णायक ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकताच मिल परिसरातील जनतेच्या वतीने आमदार अनुप अग्रवाल यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या सत्कार समारंभात बोलताना आ. अनुप अग्रवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सातबारा मिळावा यासाठी खऱ्या अर्थाने श्रेय बंटी मासुळेंनाच जाते. महापालिकेत ठराव करण्यापासून ते नाशिक, पुणे, मुंबई येथे कागदपत्रांची धावपळ बंटीनेच केली. मी फक्त मंत्रालयातून मंजुरी आणली.”
![]() |
| - Advertisement - |
गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून मिल परिसरातील रहिवाशांच्या मालकी हक्काचा प्रश्न रखडला होता. त्या भागातील सुमारे 2,500 घरांना सातबारा मिळवून देण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न केले गेले. माजी नगरसेवक अमोल मासुळे यांनीही या कार्यात मोलाची भूमिका बजावत आमदारांचे आभार मानले. “हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बंटी मासुळेंनी सातत्याने प्रयत्न केले. पण तो शेवटी मार्गी लागला, याचे श्रेय अनुपभैय्यांच्या मजबूत पाठबळालाच आहे,” असे मासुळे म्हणाले.
आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी आपल्या भावनिक भाषणात सांगितले की, “मिल परिसर माझ्या जडणघडणीतला भाग आहे. येथील जनतेच्या अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. तुमच्यासाठी काही करता आले, तर तोच माझ्यासाठी खरा सन्मान.” त्यांनी पुढे सांगितले की, मिल परिसरातील 2500 घरे, नगावबारीतील 650 घरे आणि गवळीवाड्यातील 300 घरे अशा एकूण 3,450 घरांना हक्काचा सातबारा लवकरच मिळणार आहे.
यावेळी त्यांनी पुढील योजनांचा देखील आढावा घेतला. रावेर एमआयडीसीसाठी लवकरच 2,000 एकर जमीन उपलब्ध होणार असून, त्यात साडेआठ हजार कोटींचे उद्योग उभे राहणार आहेत. “त्याचा थेट फायदा मिल परिसरासह धुळ्यातील बेरोजगार तरुणांना होईल,” असे त्यांनी सांगितले.
चितोड रोडवरील 28 क्रमांक शाळेच्या जागेत क्रीडा संकुल, व्यापारी संकुल आणि आधुनिक शाळा उभारण्यात येणार आहे. यामागची संकल्पना देखील बंटी मासुळेंचीच असल्याचे त्यांनी नमूद केले.
![]() |
| - Advertisement - |
याशिवाय, आमदार अनुपभैय्या यांनी गरिबांसाठी सरकारी योजना घराघरात पोहोचवण्याचे आश्वासन दिले. “सरकार योजना तयार करते, पण त्या गरजूंपर्यंत पोहचत नाहीत. मी स्वतः योजनांची माहितीपुस्तिका घरोघरी पोहोचवणार आहे,” असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक बंटी मासुळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, “गेल्या सात-आठ वर्षांपासून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. महापौर प्रतिभा चौधरी यांच्या कार्यकाळात आमदार अनुपभैय्यांच्या सुचनेवर महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. आमदार नसतानाही अनुपभैय्यांनी मला सतत मार्गदर्शन केले. एकदा आमदार झाल्यावर त्यांनी हा विषय पूर्णत्वास नेण्याचे काम वेगाने केले.”
याप्रसंगी सुनील पाटील, गणेश गायकवाड, शाहीर गंभीर महाराज बोरसे, वाल्मीक जाधव, भगवान कुंभार आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत अनुप अग्रवाल व बंटी मासुळे यांचे आभार मानले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सारांशतः, धुळे शहरातील एक अत्यंत ज्वलंत प्रश्न — सातबारा मिळवण्याचा — आता मार्गी लागत असून, यामध्ये माजी नगरसेवक बंटी मासुळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रभावी हस्तक्षेपाला महत्वाचे स्थान आहे. आगामी काळात विकासाच्या नव्या संधींसह, या भागातील नागरिकांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे.
____________________________________________



