![]() |
बुरझड येथे कृषि सेवा केंद्रावर मध्यरात्री दरोडा; ५० हजारांचे बी-बियाणे लंपास
बुरझड येथील राकेश दादाभाई पाटील यांच्या मालकीचे ‘धनाई पुनाई माता कृषि सेवा केंद्र’ हे गावातील प्रमुख कृषि उत्पादने आणि बियाण्यांचे विक्रय केंद्र आहे. काल रात्री चोरट्यांनी या कृषि केंद्राचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर उचकटून त्याखालची लोखंडी पट्टीसह कुलूप तोडले आणि ती बाजुला फेकली होती. ही घटना अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने पार पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
![]() |
| - Advertisement - |
चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर थेट बी-बियाण्यांवर हात मारत मोठ्या प्रमाणात बी-बियाणे लंपास केले. या चोरीत जवळपास ४० ते ५० हजार रुपयांचे बी-बियाणे चोरीस गेले असून, यामध्ये सोयाबीन, कपाशी आणि इतर मौल्यवान वाणांचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच ठसेतज्ज्ञांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पुरावे गोळा केले असून, दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दरम्यान, अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनगीर पोलीस करत आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या घटनेमुळे बुरझड गावातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गातही बी-बियाण्यांच्या तुटवड्याची चिंता व्यक्त केली जात असून, संबंधित चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून होत आहे.
____________________________________________


