धुळे दर्पण न्यूज :-  शहरातील देवपूर परिसरात घडलेल्या शारदा उर्फ पूजा बागुल खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. अवघ्या आठवडाभरात या गुन्ह्याचा धुळे पोलिसांनी यशस्वी छडा लावत चार आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. या हत्येमागे अनैतिक संबंध, अंधश्रद्धा आणि सुपारीचे गूढ गुंफले गेले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  २९ मे रोजी वलवाडी, देवपूर येथे पूजा बागुल हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. प्रारंभी आत्महत्या समजल्या गेलेल्या या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास केला असता, तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिचा पती कपिल बागुल, त्याचे वडील बाळू बागुल, आई विजया बागुल, बहिण रंजना माळी आणि प्रेयसी प्रज्ञा कार्डीले यांना अटक केली. कपिलने पत्नीला पेस्टीसाईडचे इंजेक्शन देऊन मारल्याचे कबूल केले होते.

- Advertisement -

  मात्र तपास अधिक खोलात गेल्यानंतर पोलिसांच्या हाती आणखी धक्कादायक माहिती लागली. खुनामध्ये केवळ कुटुंबातीलच नव्हे, तर बाहेरच्या चौघांनी सहभाग घेतल्याचे उघड झाले. कपिलच्या सांगण्यावरून आणि पुढील चौकशीतून या हत्येमध्ये भूषण बापू काळे (२०), यश उर्फ जयेश जगताप (१९), सचिन उर्फ बब्या जाधव (३५), एक विधीसंघर्षग्रस्त बालक आणि साई उर्फ आकाश माळी या पाच जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यापैकी चार आरोपी पोलिसांच्या तावडीत असून, साई माळी अद्याप फरार आहे.

  पोलिसांनी भूषण, यश, सचिन आणि बालकाला ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाली. त्यांनी पूजाच्या घातासाठी विषारी द्रवाचा वापर केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याची मुळे अंधश्रद्धेत खोलवर रुजलेली आहेत.


भूषण काळे – ‘तांत्रिक’ हत्यारा

  भूषण काळे याची परिसरात तंत्रमंत्र जाणणारा आणि 'सिद्धी' असलेला माणूस म्हणून ख्याती आहे. कपिल बागुलने पत्नीच्या मृत्यूसाठी आधी तांत्रिक मार्ग निवडला होता. त्यासाठी त्याने भूषणशी संपर्क साधून, प्रेयसी प्रज्ञा कार्डीले व आई विजया यांच्या मदतीने भूषणच्या खात्यावर पैसेही वर्ग केले होते. करणीने पूजा मरेल अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षित परिणाम न मिळाल्याने कपिलने सरळ खुनाचा मार्ग पत्करला.

  पैसे घेऊन काम न झाल्याने कपिलने भूषणवर दबाव टाकायला सुरुवात केली. या कारणातूनच भूषण व त्याच्या साथीदारांनी प्रत्यक्ष खून करण्याचा कट रचला. त्यांनी थेट कपिलच्या घरात प्रवेश करून, विषारी पदार्थाच्या साहाय्याने पूजाची हत्या केली. यामध्ये कपिलची संमती आणि सुपारी स्पष्टपणे समोर आली आहे.

- Advertisement -
फरार आरोपीचा शोध सुरु

  या प्रकरणातील आरोपी साई माळी अद्याप फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर असून, लवकरच त्यालाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्याचा यशस्वी तपास आणि चौकशीबद्दल पोलिसांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

कसून तपासाचे श्रेय...

  या गुन्ह्याचा यशस्वी तपास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे एपीआय तुषार देवरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. या मोहिमेत एसपी श्रीकांत धिवरे, एएसपी किशोर काळे, डीवायएसपी राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शन लाभले.

  पूजा बागुल खून प्रकरणाने समाजात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अंधश्रद्धा, अनैतिक संबंध, सुपारी खून आणि पारंपरिक नात्यांमधील दुराव्यांची ही भीषण कहाणी – धुळे जिल्ह्यासाठी एक मोठा धक्का ठरली आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेद्वारे या प्रकरणाला न्याय मिळणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -