धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरासह शिंदखेडा तालुक्यात कॉलराचे रुग्ण आढळून येत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे शहरातील हिरे रुग्णालयात सध्या कॉलराने बाधित दोन बालकांवर उपचार सुरू असून, इतर तीन बालकांमध्येही कॉलरासदृश लक्षणे आढळली आहेत. यासोबतच साक्री रोड परिसरात अतिसाराची साथ पसरल्याचे निदर्शनास आले असून, तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  साक्री रोड परिसरातील मोगलाई, शनी नगर आणि भीमनगर भागात मंगळवारी १५ रहिवाशांमध्ये उलट्या-जुलाबाचे लक्षणे दिसून आली. यानंतर सर्व रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले. दूषित पाण्यामुळे कॉलरासारख्या साथीचे आजार पसरण्याचा धोका लक्षात घेता, नागरिकांना स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली जात आहे.

- Advertisement -

  दरम्यान, शिंदखेडा तालुक्यातील अमळथे येथील एका चार वर्षांच्या बालकाला कॉलराची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्याच्या कुटुंबातील इतर तीन बालकांनाही अतिसार, जुलाब व उलट्यांचा त्रास असून, त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. धुळे शहरातील मिल्लत नगरातील पाच वर्षांच्या मुलालाही कॉलराची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

  या पाचही बालकांवर हिरे रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे आणि अधीक्षक डॉ. अजित पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नीता हटकर व अन्य वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत.


जीबीएस रुग्णाचीही नोंद

  साक्री रोडवरील चंपा बाग परिसरातील ५१ वर्षीय एका प्रौढाला गिलिअन बॅरे सिंड्रोम (GBS) या गंभीर आजाराची लागण झाली आहे. सुरुवातीला त्यांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु प्रकृती खालावल्याने त्यांना हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर डॉ. निर्मलकुमार रवंदळे यांच्याकडून उपचार सुरू आहेत.


नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना

  • फक्त उकळून थंड केलेले पाणीच प्या.
  • कच्च्या भाज्या व फळे नीट धुवूनच खावीत.
  • रस्त्यावर मिळणारे कच्चे खाद्यपदार्थ टाळावेत.
  • शौचानंतर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • लहान बालकांना केवळ स्तनपान करावे आणि रोटा व्हायरस लसीकरण करून घ्यावे.


अधिका-यांचे आवाहन

  “कॉलराची साथ दूषित पाण्यामुळे पसरते. त्यामुळे स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करून औषधोपचार घ्यावेत,” असे आवाहन हिरे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजित पाठक यांनी केले.

  धुळे महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणांनी परिसरात अधिक काटेकोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून, नागरिकांनी घाबरून न जाता सजग आणि दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -