धुळे दर्पण न्यूज :- साक्री तालुक्यातील लखमापूर शिवारात बुधवारी पहाटे भीषण घटना घडली. बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवून एकाच वेळी तब्बल २२ मेंढ्यांचा बळी घेतला, तर काही मेंढ्यांची पिले गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीचं सावट पसरलं आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  ही घटना नागपूरपैकी लखमापूर येथील शेतकरी तुकाराम रघु सुसाडे आणि किरणबाई मोहन सुसाडे यांच्या मालकीच्या मेंढ्यांवर घडली. पहाटेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या कळपावर हल्ला चढवला. या झडपेत २२ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या, तर काही पिल्ले जखमी झाली. घटनास्थळी श्वापदाच्या हालचालींचे ठसे स्पष्टपणे आढळून आले.

- Advertisement -

  सध्या या भागात बिबट्या आणि इतर हिंस्र वन्य प्राण्यांचा वावर सतत वाढत असल्याचे चित्र आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये अनेक मुक्या जनावरांचा बळी गेला आहे. परिणामी, शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः रात्रपाळीच्या वेळी शेतशिवारात जाणं टाळलं जात आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र अधिकारी व्ही. के. खैरनार, पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती मोरखंडे, म्हसाळे वनपाल एम. एम. बच्छाव आणि हट्टी वनरक्षक बारेला यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत मेंढ्यांचा पंचनामा करून पाहणी केली. नुकसानभरपाईसाठी आवश्यक त्या कारवायाही राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

  घटनास्थळी महाराष्ट्र राज्य मेंढपाळ समस्या निवारण समितीचे सदस्यधुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक, तसेच गावचे सरपंच, उपसरपंच, पीडित मेंढपाळ व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  धुळे जिल्ह्यात पशुधन हे अनेक ग्रामीण कुटुंबांचे प्रमुख आर्थिक साधन आहे. अशा हल्ल्यांमुळे मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाने कॅमेरे बसवणे, पिंजरे लावणे, तसेच सतत गस्त वाढवणे यांसारख्या उपाययोजना हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम