धुळे दर्पण न्यूज :- शहरातील अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर संतप्त नागरिकांनी धडक कारवाईची मागणी केली आहे. महापालिका आयुक्त श्रीमती अमिता पाटील यांना यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले असून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
शहरातील विविध प्रभागांमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक गटारी तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यांवर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून साथीचे आजार पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून त्यातून दुर्गंधी आणि माशांचा उपद्रवही वाढलेला आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक १२ ची परिस्थिती अत्यंत दयनीय
प्रभाग क्रमांक १२ मध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या भागात नेमून दिलेले सहा स्वच्छता कर्मचारी वारंवार अनुपस्थित असतात. त्यांच्या जागी दाखल करण्यात आलेल्या बदली कामगारांचीही प्रत्यक्षात उपस्थिती नसते. त्यामुळे संपूर्ण प्रभागाचे स्वच्छतेचे काम अर्धवट होते, परिणामी नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
![]() |
| - Advertisement - |
चिरीमिरीचा आरोप; भ्रष्टाचाराने बळावलेली यंत्रणा
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेतली जाते. दर महिन्याच्या शेवटी पगार झाल्यानंतर काही कामगार अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ देतात. त्यामुळे जबाबदारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या गंभीर समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांनी विभागीय चौकशीची केली मागणी
निवेदनाद्वारे नागरिकांनी मागणी केली आहे की, आयुक्त श्रीमती अमिता पाटील यांनी स्वतः या प्रभागांचा दौरा करावा. तसेच दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने विभागीय चौकशी करण्यात यावी आणि आवश्यक त्या कडक शिस्तभंग कारवाया करण्यात याव्यात, जेणेकरून शहरातील स्वच्छतेबाबत जबाबदारी निश्चित होईल आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या निवेदनावर डॉ. सर्फराज अन्सारी, अमेर अन्सारी, अब्दुल लतीफ अन्सारी, मुख्तार मंसूरी, वसीम शेख मंत्री आदींच्या सह्या असून, त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे.


