धुळे दर्पण न्यूज :- देवपूरातील प्रभातनगर परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक अपघातात भरधाव वेगातील कारने दुचाकीस्वार दोघांना जोरात धडक दिली. केवळ तीन सेकंदात घडलेल्या या अपघातात कापडणे येथील रहिवासी श्याम जोशी आणि हेमलता जोशी गंभीर जखमी झाले. कारचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून, या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ परिसरातील एका इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मुलीला भेटण्यासाठी आले होते शहरात
प्राप्त माहितीनुसार, जखमी श्याम जोशी आणि त्यांच्या पत्नी हेमलता जोशी हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी कापडणेहून धुळे शहरात आले होते. प्रभातनगर परिसरातील दत्त मंदिरासमोरील रस्त्यावरून ते दुचाकीवरून जात असताना पुलाकडून भरधाव वेगात येणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे कार चालकाने हॉर्नही वाजवला नव्हता आणि कोणतीही सावधगिरी बाळगलेली नव्हती. अचानकपणे आलेल्या धडकेत जोशी दाम्पत्य काही अंतरावर फेकले गेले.
![]() |
| - Advertisement - |
स्थानिक नागरिकांची तत्परता; रुग्णालयात दाखल
अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे दोघांचेही प्राण वाचले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताची दृश्ये कैद
ही घटना अगदी काही सेकंदात घडल्यामुळे अनेकांना काय झाले ते समजलेच नाही. मात्र, जवळच्या इमारतीवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा अपघात स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या पोलीस प्रशासन संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाचा क्रमांक आणि चालकाचा तपास करत आहे.
रस्त्यावर गतिरोधक नाही; पूर्वीही झाले अपघात
प्रभातनगरचा फलक ते पांझरा नदीवरील बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता हे ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या परिसरात एसएसव्हीपीएस कॉलेजपर्यंत भूमिगत गटारीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून, त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. यामुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे आणि मुख्य रस्त्यांऐवजी अनेक चालक पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. विशेषतः दत्त मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर वळण आहे, मात्र त्या ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
स्थानिक नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “या भागात स्पीड ब्रेकरची अत्यंत गरज असून, पालिकेने आणि वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता पळ काढल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


