धुळे दर्पण न्यूज :- शहरातील जय हिंद कॉलेजजवळील ‘बेकर बास्केट’ या प्रसिद्ध फास्टफूड व बेकरी दुकानातून खरेदी केलेल्या पावमध्ये किडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या दूषित पावाचे सेवन केल्यानंतर एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला गंभीर त्रास होऊन तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अन्न व औषध प्रशासन विभागाने याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  सुनयना किरण पाटील (वय २८) या गर्भवती महिलेने त्यांच्या पतीसह ‘बेकर बास्केट’मधून नियमितप्रमाणे पाव खरेदी केला. घरी येऊन तो पाव खाल्ल्यानंतर काही वेळातच सुनयनाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांच्या सात महिन्यांच्या गर्भधारणेचा काळ असल्याने प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

- Advertisement -

  घटनेनंतर किरण पाटील यांनी उरलेला पाव तपासला असता त्यात स्पष्टपणे किडे व अळ्या आढळून आल्या. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर त्यांनी संबंधित पाव आणि पॅकेटसह दुकानात धाव घेतली. मात्र, दुकान मालक पराग पाटील यांना जबाबदारीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या असंवेदनशील वर्तणुकीमुळे किरण पाटील यांचा संताप अनावर झाला.

  या गंभीर प्रकाराची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडे (FSSAI) दाखल करण्यात आली आहे. दूषित व आरोग्याला अपायकारक खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यांनी संबंधित पावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवाल आल्यानंतर अधिकृत कारवाई अपेक्षित आहे.

  या घटनेनंतर धुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावरही या घटनेचा निषेध करत बेकरीविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिक्रिया अपेक्षित

  दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई व्हावी, असे आवाहन नागरिक करत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व खाद्य विक्रेत्यांची तपासणी केली जावी आणि नियमबाह्य व्यवसायावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही आता होत आहे.

- Advertisement -
नागरिकांनी घ्यावी काळजी

  या घटनेनंतर अन्न विक्रेत्यांकडून खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घ्यावी, अन्नपदार्थाची गुणवत्ता तपासूनच सेवन करावे, तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -