माजी आमदार अनिल अण्णा गोटेंचा स्फोटक आरोप : "१.८४ कोटींचा गुन्हा 'अदखलपात्र' कसा?"


  धुळे दर्पण न्यूज :-  शिवसेनेचे नेते, माजी आमदार आणि कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांनी गुलमोहर विश्रामगृह प्रकरणी थेट राज्य सरकारला, गृह खात्याला आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. “१ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांच्या खंडणीचा गुन्हा ‘अदखलपात्र’ ठरतो का?” असा खडा सवाल करत गोटे यांनी प्रशासनावर व घराणेशाहीवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे.

  गोटे यांनी मुख्यमंत्री, गृहसचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक) यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रात हे गंभीर आरोप नोंदवले आहेत. २१ आणि २२ मेच्या रात्री गुलमोहर विश्रामगृहातील रूम क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या १.८४ कोटी रुपयांच्या बेहिशोबी रकमेची माहिती वेळेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देऊनही त्यांनी ११ वाजेपर्यंत दुर्लक्ष केल्याचे गोटेंचे म्हणणे आहे.

- Advertisement -

  गोटे यांनी यावेळी असा आरोप केला की, “प्रकरण आमदारांच्या समितीशी संबंधित असल्यामुळे गृह विभागाकडून आलेल्या दबावाखाली वरिष्ठ आयपीएस अधिकारी झुकले. त्यामुळे हे प्रकरण ‘अदखलपात्र’ म्हणून फाईल करण्यात आले.”

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

“दंड सर्वसामान्यांना – पण करोडोंच्या बेहिशोबी रकमेवर दुर्लक्ष?”

गोटे यांनी विचारले की, “सामान्य वाहनचालकाने रॉंग साईडने गाडी चालवली तर त्याला ५,००० रुपये दंड, लायसन्सशिवाय गाडी चालवली तर १०,००० रुपये दंड – हे सगळं होऊ शकतं; पण सरकारच्या विश्रामगृहात करोडोंचा अवैध पैसा सापडतो, आणि त्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला जातो? कायद्याचे हे दुहेरी मापदंड राज्यातील जनतेने किती दिवस सहन करायचे?”

- Advertisement -

  त्यांनी असा गंभीर आरोप केला की, “प्रकरण न्यायालयात जावे, तिथून आदेश यावेत, मगच तपास करावा – हा सगळा नियोजनबद्ध वेळकाढूपणा आहे. यात प्रामाणिकपणाचा लवलेश नाही.”

“राजकीय संरक्षणाखाली गुन्हे लपवले जात आहेत”

अनिल गोटेंनी पोलीस अधिकाऱ्यांनीच घटनास्थळी भेट दिल्याचे आणि परिस्थिती पाहूनही कठोर कारवाई न केल्याचे निदर्शनास आणले. “पोलीस अधिकार्‍यांना खरे गुन्हेगार समोर आणण्याची संधी होती, पण त्यांनी गृहविभागाची अब्रू झाकण्यासाठी या प्रकरणाची बदनामी लपवण्याचा प्रयत्न केला.”

गृहखात्याची 'रुग्णासारखी' अवस्था

गोटे यांचे म्हणणे आहे की, “सध्या गृहखात्याची अवस्था अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णासारखी झाली आहे. पोलीस यंत्रणा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या खाकी गणवेशात परिवर्तित झाली आहे. आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची लाचारी बघून खरोखर मन विषण्ण होते.”

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट

पत्राच्या शेवटी गोटे यांनी मुख्यमंत्र्यांनाही थेट सवाल केला – “तुम्ही 'माझा कट्टा' मध्ये म्हटले होते की राष्ट्रवादीशी युती नाही! तसेच भ्रष्टाचाराबाबतही तुम्ही 'नाही, नाही, नाही' म्हणत होता, मग या प्रकरणात कारवाई का नाही? जर हे प्रकरणही 'राधेश्याम मोफलवार' प्रकरणासारखे गाडायचे असेल, तर मग स्पष्टपणे जनतेला सांगा – मी असेच राज्य चालवणार आहे!”


संपादकीय टिप्पणी
गुलमोहर विश्रामगृह प्रकरणात लाखो नव्हे तर कोट्यवधींची रक्कम आढळल्याचे अनिल गोटेंचे म्हणणे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा स्वतंत्र आणि पारदर्शक तपास होणे आवश्यक आहे. 'अदखलपात्र गुन्हा' असा शिक्का मारून प्रकरण गाडण्याचा प्रयत्न झाला असेल, तर तो न्यायव्यवस्थेच्या गळचेपीसारखा आहे. आता जनतेच्या डोळ्यांत धूळफेक होणार की न्याय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- Advertisement -


धुळे दर्पण आपल्या वाचकांसाठी या प्रकरणातील पुढील घडामोडींचे बारकाईने विश्लेषण करत राहील.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -