धुळे दर्पण न्यूज :- धुळे ग्रामीणचे माजी आमदार, काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आणि लोकसभा उमेदवार राहिलेले कुणाल पाटील यांनी अखेर आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या भव्य आणि ऐतिहासिक समारंभात महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मावळते प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, जयकुमार गोरे यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे केवळ धुळे जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटली आहे. त्यांच्या पाठोपाठ तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
![]() |
| - Advertisement - |
लाखो लोकांचा विश्वास, हजारोंची उपस्थिती
या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी धुळे जिल्ह्यातून तब्बल ६०० हून अधिक वाहनांचे ताफे मुंबईत दाखल झाले. नाशिक ते मुंबई महामार्गावर कुणाल पाटील यांच्या स्वागतासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी आणि त्यांच्या वाहनांचा ताफा लक्ष वेधून घेणारा ठरला. मंत्रालय परिसर, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट, विधान भवन परिसरात कुणाल पाटील यांच्या स्वागतासाठी झळकलेले बॅनर, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता.
काँग्रेसचा मजबूत खांब भाजपकडे
कुणाल पाटील हे काँग्रेस पक्षात NSUI, युवक काँग्रेसपासून कार्यरत होते. त्यांनी युवकांमध्ये एक वेगळा प्रभाव निर्माण केला असून, त्यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो युवकांनी काँग्रेसमध्ये काम केले आहे. दोन वेळा आमदार आणि एकदा लोकसभा उमेदवार राहिलेल्या पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते सिंचन आंदोलनापर्यंत विविध मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. त्यांच्या विधानसभेतील प्रभावी कामामुळे त्यांना संसदरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
'महाब्रँड' नेता मिळाल्याचा भाजपचा दावा
पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपाला धुळे जिल्ह्यात एक 'महाब्रँड' नेता मिळाला आहे. जिल्ह्यातील विविध भागांत त्यांनी राबवलेली विकासकामे, दांडगा जनसंपर्क, आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेले आंदोलन यामुळे त्यांचा प्रभाव प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी त्यांचा प्रवेश हा ‘गेम चेंजर’ ठरण्याची शक्यता आहे.
![]() |
| - Advertisement - |
अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
या सोहळ्यात केवळ कुणाल पाटीलच नव्हे, तर त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांतील अनेक माजी पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी सभापती, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक, महिला नेते, युवक नेते, ग्रामपंचायत सरपंच, आणि शेकडो कार्यकर्ते यांचा समावेश होता.
प्रवेश सोहळ्याला हजेरी लावलेले नेते
या भव्य समारंभाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, मंत्री जयकुमार गोरे, आमदार स्मिता वाघ, मंगेश चव्हाण, अनुप अग्रवाल, राम भदाणे, महामंत्री विजय चौधरी, राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, शहराध्यक्ष गजेंद्र अंपाळकर, माजी महापौर प्रदीप करपे, भरती देवरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
– धुळे दर्पण –



