आ. अनुप अग्रवाल यांच्या लक्षवेधीवर विधानसभेत महत्वाचा निर्णय
धुळे दर्पण न्यूज :- धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह राज्यातील आदिवासी समाजातील नागरिकांच्या होत असलेल्या धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर आता शासनाने कडक पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अवैधपणे उभारण्यात आलेल्या चर्च हटविण्यात येणार असून, धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते.
विविध प्रलोभनांतून धर्मांतराची वाढ – आ. अग्रवाल
विधानसभेत आज झालेल्या चर्चेत आ. अनुप अग्रवाल यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धर्मांतराच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, नंदुरबार हा अनुसूचित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला जिल्हा असून, त्या भागातील भिल्ल व पावरा या प्रमुख जनजाती समूहांमध्ये पारंपरिक आस्था व श्रद्धा टिकवण्याचा उद्देश या घोषणेमागे होता. परंतु, परदेशी निधीतून चालवल्या जाणाऱ्या मिशनरी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रलोभने दाखवून आदिवासी बांधवांचे धर्मांतर केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचा ऱ्हास होत आहे.
 |
| - Advertisement - |
अनधिकृत चर्चच्या बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर
आ. अग्रवाल यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोणतीही परवानगी न घेता चर्च बांधण्यात आले आहेत. तसेच, धुळे शहरात देखील नुकताच मुंबईहून आलेल्या युवतींकडून जिल्हा रुग्णालय परिसरात धार्मिक पुस्तकांचे वाटप करत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे उदाहरण दिले. या प्रकरणात स्वतः घटनास्थळी जाऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात अद्याप धर्मांतरबंदी कायदा लागू नसल्याने अशा घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले आणि महाराष्ट्रातही त्वरित हा कायदा लागू करण्याची मागणी केली.
धर्मांतर रोखण्यासाठी कायदा, अनधिकृत चर्च हटविणार – महसूलमंत्री बावनकुळे
या प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आदिवासी भागात होत असलेल्या धर्मांतराच्या प्रकारांविषयी शासन गंभीर आहे. विभागीय आयुक्तांकडून पुढील सहा महिन्यांत नंदुरबार, धुळे व पालघर जिल्ह्यांतील चर्चबाबत चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत अनधिकृत चर्च असल्याचे सिद्ध झाल्यास ती त्वरित हटवण्यात येतील.
धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यात कडक तरतुदी करणे, तसेच धर्मांतरासाठी प्रलोभने दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, हे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सभागृहातील ठाम आश्वासन
सभागृहातील चर्चेच्या अखेरीस महसूलमंत्री बावनकुळे यांनी अनधिकृत चर्च हटवणे, धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करणे आणि आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील, असे ठाम आश्वासन दिले.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
 |
| - Advertisement - |