धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील पाणीपुरवठा कार्यक्षम आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून, शहरातील तीन ठिकाणी वॉटर मीटर बसविण्याचे काम सुरु झाले आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांनी महापालिकेची घरपट्टी भरली आहे, त्यांनाच वॉटरमीटरसह नळ कनेक्शन देण्यात येत आहे. परिणामी घरपट्टी वसुलीतही मोठी वाढ होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमाअंतर्गत सध्या देवपूर नगावबारी परिसरातील पाटील नगर (पोदार स्कूल परिसर) आणि सुरत बायपास परिसर या दोन भागांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू आहे. हे दोन्ही भाग असे आहेत, जिथे यापूर्वी महापालिकेच्या जलवाहिन्या पोहोचलेल्या नव्हत्या. या भागातील रहिवाशांना प्रथमच अधिकृत नळ कनेक्शन मिळणार आहे.

  महापालिकेच्या नियोजनानुसार, तिसऱ्या टप्प्यात देवपूरमधील तुळशिराम नगर येथे देखील वॉटर मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सुरवातीला एकूण १५ हजार ६७८ वॉटर मीटर बसविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत सुमारे ५०० ते ६०० वॉटर मीटर यशस्वीरित्या बसविण्यात आले आहेत.

- Advertisement -

घरपट्टी भरण्याची अट

  या उपक्रमाअंतर्गत महापालिकेने एक महत्वाची अट घातली आहे – मालमत्ताधारकाने घरपट्टी भरली असेल, तरच त्या घराला वॉटरमीटरसह नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्यामुळे घरपट्टी न भरलेल्या नागरिकांचे वॉटरमीटर ‘होल्ड’ करण्यात येत आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच नागरिकांमध्ये घरपट्टी वेळेत भरण्याबाबत जागरूकता निर्माण होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा उद्देश

  सध्या धुळे शहरात बहुतांश भागांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. यंदा जलस्रोतांमध्ये भरपूर पाणीसाठा असल्याने पाणीपुरवठ्यात अडचण नाही. मात्र, पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक कुटुंबाला योग्य प्रमाणात पाणी मिळावे, या उद्देशाने वॉटरमीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वॉटरमीटरमुळे नागरिकांना वापरलेल्या पाण्याचे मोजमाप होणार असून, पाणी बचतीला प्रोत्साहन मिळणार आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  महापालिकेच्या या उपक्रमामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होणार असून, अनधिकृत नळ कनेक्शन रोखले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, पाणी ही अमूल्य संपत्ती आहे, हे नागरिकांच्या लक्षात येऊन पाण्याचा अपव्यय कमी होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -