बनावट सिलिंग पट्ट्यांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे दर्पण न्यूज :- शहरातील चाळीसगाव रोड परिसरात एका नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट सिलिंग व बॉटम पट्ट्यांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे तीन लाख ७७ हजार ३४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दुकान व गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सेंट गोबीन इंडिया प्रा.लि. मुंबई या कंपनीच्या तक्रारीनंतर करण्यात आली. फिर्यादी सर्फराज अब्दुल रऊफ तांबोळी (रा. कसबा पेठ, पवळे चौक, पुणे) यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांच्या कंपनीच्या डिझाईन व पॅटर्न प्रमाणे दिसणाऱ्या बनावट सिलिंग पट्ट्या व बॉटम पट्ट्या तयार केल्या जात आहेत. या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात साठा करून बाजारात विक्रीचा प्रयत्न होत असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

त्यानुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत स्मार्ट स्टिल, प्लॉट नं. २९, १०० फुटी रोड, धुळे या ठिकाणी छापा घातला. तसेच मुंबई-आग्रा महामार्गाजवळील गोलहन पार्क शेजारी असलेल्या गोदामाचीही तपासणी करण्यात आली. या छाप्यात दुकान व गोदामाचे मालक मुख्तार खान शहजाद खान (रा. गरीब नवाज नगर, बुशरा हॉटेल जवळ, धुळे) यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर बनावट उत्पादन व साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये –

  • सहा नग लोखंडी डाय
  • ६०० नग एलपट्टी
  • दोन सिलिंग बॉटम पट्ट्या व एलपट्टी उत्पादन करणारे यंत्र
  • १२ नग स्टीलच्या बॉटम पट्ट्या
  • १५० नग सिलिंग पट्ट्या
  • २० नग पॅरामिटर पट्ट्या

यांचा समावेश असून, एकूण किंमत ३,७७,३४० रुपये इतकी आहे. प्राथमिक चौकशीत, मुख्तार खान शहजाद खान यांनी स्वतःच्या फायद्यासाठी व विक्रीसाठी या बनावट पट्ट्यांचा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारातून सेंट गोबीन इंडिया प्रा.लि. या कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मुख्तार खान शहजाद खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सहभाग घेतला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हरीश्चंद्र पाटील, अविनाश वाघ, रमाकांत पवार, शोएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, निलेश चव्हाण, संदीप वाघ, सुर्यकांत भामरे, धीरज सांगळे, राकेश मोरे आदींचा समावेश होता.

शहरात मोठ्या प्रमाणावर बनावट उत्पादनांची विक्री थांबवण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवायांमुळे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. बनावट उत्पादन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.