धुळे दर्पण न्यूज :- अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या (रविवार, दि. 20 जुलै) धुळे शहरातील हॉटेल गोल्डन लिफ येथे होत आहे. पहिल्यांदाच या बैठकीचा मान धुळ्याला मिळाला असून, यात नवीन पदाधिकारी नियुक्तीसह समाजहिताच्या विविध विषयांवर सविस्तर विचारमंथन होणार आहे. या बैठकीला देशातील 11 राज्यातील राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुमारे पाचशेहून अधिक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल नेरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषद धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे, प्रदेश कार्यवाह अजय कासोदेकर, प्रदेश समन्वयक विवेक वाणी, विविध आघाडीचे अध्यक्ष रविंद्र मालपूरे, भुषण सोंजे, प्रशांत ब्राम्हणकर, धुळे शहराध्यक्ष पवन खानकरी, दिलीप पाखले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
नेरकर म्हणाले की, धुळे शहराचा विकास साधण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. आजही शहरात मोठा उद्योग वा व्यवसाय नाही. त्यामुळे तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते. त्यावर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून धुळ्यात मोठा उद्योग व आयटीपार्क मंजूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “यामुळे येथील तरुणांना बाहेर जावे लागणार नाही, तसेच जे गेले आहेत ते पुन्हा शहरात येऊन शेती, उद्योग आणि नोकरी करू शकतील,” असेही ते म्हणाले.
![]() |
| - Advertisement - |
वाणी समाजाच्या प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. देशभरातील वाणी समाजातील एकूण 26 पोटजातींपैकी पाच पोटजाती एकत्र आणण्यात संस्थेला यश मिळाले आहे. आणखी काही पोटजातींना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आंदोलन केल्याचेही नेरकर यांनी नमूद केले. त्यास यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
उद्या सकाळी 8 वाजता सुरू होणाऱ्या बैठकीत पहिल्या सत्रात नवीन पदाधिकारी निवडले जाणार आहेत. दुसऱ्या सत्रात विविध राज्यांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड होईल. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी, समाजातील वैवाहिक समस्या, महिलांना गृह व लघुउद्योगासाठी मदत, शैक्षणिक संस्था सुरू करणे, समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान आणि समाज संघटन यावर विशेष विचारमंथन होणार आहे.
नेरकर यांनी सांगितले की, समाजातील मुलींच्या योग्य वयात लग्नासाठी, तसेच केवळ नोकरी करणाऱ्या वराची अपेक्षा न ठेवता शेतकरी व व्यावसायिक वरांचाही विचार व्हावा, यासाठी समाजात प्रबोधन सुरू करण्यात येईल. “कारण शेतकरी पिकवणार नाही तर पोट कसे भरणार? भविष्यात एआयमुळे अनेक नोकर्या धोक्यात येऊ शकतात, त्यामुळे मुलींनी केवळ नोकरीधारक नव्हे, तर शेतकरी आणि व्यावसायिकांनाही पसंती द्यावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
![]() |
| - Advertisement - |
नेतृत्वाची संधी देण्याच्या संदर्भात नेरकर म्हणाले, “वाणी समाजाची राज्य व जिल्ह्यात निर्णायक भूमिका असली तरी अद्याप समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. जो पक्ष समाजाला न्याय देईल, त्या पक्षाच्या माध्यमातून समाजातील नेतृत्व इच्छुकांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
अखेर, समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असा निर्धार व्यक्त करत नेरकर यांनी शहरातील उद्योग, आयटीपार्क, शिक्षण आणि सामाजिक संघटनासाठी भविष्यातील दिशा स्पष्ट केली.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


